चिमुकली तिसऱ्या मजल्यावरून पडणार तेवढ्यात…!!! पुण्यात थरकाप उडवणारी घटना आली समोर, नेमकं काय घडलं?

पुणे : लहान मुलांना घरी एकटं सोडून पटकन जवळपास जाऊन येणाऱ्या पालकांची उदाहरणं आजूबाजूला पाहायला मिळतात. मात्र नकळत्या वयातील मुलांनी कुतुहलातून उचलेली काही पावलं त्यांचा जीव धोक्यात घालणारी ठरु शकतात. याचं उदाहरण नुकतंच पुण्यात पाहायला मिळाले आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या ग्रिलच्या पोकळीतून बाहेर गेलेल्या चार वर्षांच्या मुलीचे प्राण थोडक्यात बचावले.

नेमकं घडलं काय?
पुण्यातील गुजर निंबाळकरवाडी मधील सोनवणे बिल्डींगमधे राहणारी चांदणे नावाची महिला तीच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना चार वर्षांच्या भाविका नावाच्या लहान मुलीला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात बंद करुन बाहेरुन कुलुप लावून गेली होती. मात्र त्यानंतर चार वर्षांची ती मुलगी चालत खिडकीत पोहचली आणि लोखंडी जाळीतून डोके बाहेर काढून बाहेर सज्ज्यावर आली.

मात्र त्यानंतर त्या मुलीला आपण कुठे पोहचलो आहोत हे समजले आणि तीने खीडकीचा गज पकडून ठेवला. हे सगळं दृष्य पाहून सोसायटीतील लोकांनी आरडाओरड केला. अग्नीशमन दलात तांडेल म्हणून काम करणारे योगेश चव्हाण वीकली ऑफ असल्याने घरीच होते.
त्यांनी लगेच तिसऱ्या माळ्यावरती धाव घेतली. मात्र घराला कुलुप होते. त्यामुळे चव्हाण पुन्हा धावत खाली आले आणि मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या चांदणे यांच्याकडून चावी घेऊन घराचा दरवाजा उघडला आणि भाविकाला सज्जावरुन ओढून खिडकीतून आतमध्ये घेतलं. सकाळी नऊ वाजुन सहा मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेमुळं परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता. त्या मुलीला आत घेतल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.