रिक्षाप्रवाश्याला लुटणाऱ्या रिक्षाचालकासह चौघांवर लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा; कदमवाकवस्ती येथील घडलेला प्रकार ….

लोणी काळभोर : सुरक्षा रक्षक पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून रिक्षातून प्रवास करीत असताना त्याला रिक्षाचालकासह ४ जणांनी मारहाण करून लुटल्याची घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मिसळ हॉटेल समोर घडली आहे. यामध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. याप्रकरणी चार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना

रविवार (७ सप्टेंबर) रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये नामदेव विकास पवार (वय २३, रा. शितळादेवी मंदिराजवळ, पाडवदंड रोड, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे. मुळ गाव उदतपुर ता. लोहारा, जि. धाराशिव) हे जखमी झाले आहेत. त्यांच्याजवळील १८ हजार रुपये किंमतीचा मोबाइल फोन व साडेतीन हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.
नामदेव पवार हे खाजगी सुरक्षा रक्षकाचे काम करतात. ते नेहमीप्रमाणे रविवारी रिक्षा क्रमांक एमएच १२ के आर २०७० मधून कामावर चालले होते. तेव्हा रिक्षामध्ये ४ अनोळखी इसम होते. त्यापैकी रिक्षा चालकाचे डोक्याचे केस लांब, शरीराने मजबूत असून त्याचे वय अंदाजे २५ वर्ष होते.

चालकाशेजारी पुढे बसलेला इसमही अंदाजे २५ वर्षाचा होता. त्याच्या डोक्याचे केस बारीक व अंगाने सडपातळ होता. रिक्षाच्या मागील सीटवर डाव्या बाजुस बसलेल्या इसमाने अंगात काळे रंगाचा शर्ट घातला होता. त्याच्यासुद्धा डोक्याचे केस लांब, वय अंदाजे २५ वर्षे होते. तर उजव्या बाजुस बसलेला इसम वय २५ वर्षे, अंगाने मजबूत, डोक्यात मुस्लीम लोक घालतात तशी गोल टोपी घातली होती. तर पवार हे पाठीमागील सिटच्या मध्यभागी बसले होते.
रिक्षा पुणे सोलापूर महामार्गावरून मधुन जात असताना, कदमवाकवस्ती येथील दत्त मिसळ हॉटेलसमोर रिक्षा आल्यानंतर रिक्षा बाजूला घेतली. आणी पवार यांना रिक्षा चालकासह त्याच्या सोबत असलेले इतर तीन इसमांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पवार यांना रिक्षातुन खाली ढकलुन दिले. यामुळे पवार यांना पायाच्या टाचेला जखम झाली. तर मांडीला मुक्कामार लागला आहे.
पवार यांना जखमी केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट व खिशातील पाकीट मधील साडेतीन हजार रुपयांची रोकड, आधार कार्ड, पॅनकॉर्ड, एटीएम कार्ड असे जबरदस्तीने काढून चोरुन नेले. याप्रकरणी नामदेव पवार यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर करीत आहेत.