शेतकऱ्यांच्या शेतीजमीनीत चोरून माती उपसा करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल; यवत पोलिसांची कामगिरी

यवत : यवत (ता. दौंड) येथील कडेठाण येथे रात्रीच्या सुमास जेसीबी मशीनच्या साह्याने बेकायदा माती उत्खनन करून त्याची चोरी करून वाहतूक करणाऱ्या धनंजय टेंगले याच्यासह सहा जणांवर यवत पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे.
धनंजय रावसाहेब टेंगले (रा.वरवंड, ता.दौंड, जि.पुणे), कुरबान जेयनुल अन्सारी ( सध्या रा. वरंवड ता.दौंड जि.पुणे मुळ रा. मलकोको ता. बरही, जि.हजारीबाग राज्य झारखंड ), अरशद असगर अन्सारी (सध्या रा. वरंवड ता.दौड जि.पुणे मुळ रा. मलकोको ता. बरही, जि.हजारीबाग राज्य झारखंड, हायवा ट्रक चालक ), मंगेश विनायक आमराव ( रा. देऊळगाव राजे, ता.दौंड, जि.पुणे ), दगडु बाळु घुले (रा.नांदुर, ता.दौंड, जि.पुणे ), स्वप्नील काटकर (पुर्ण नाव माहित नाही) रा.शिरापुर, ता.दौंड, जि.पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चोरट्यांचे नावे आहेत. त्यांच्यावर बेकायदा माती उत्खनन करून चोरी करणे तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, तालुक्यातील वरवंड, कडेठाण, दापोडी, कानगाव या भागातील शेतजमिनीत शेतकऱ्यांच्या सहमतीने बेकायदा माती उत्खनन करून ती परिसरातील वीटभट्ट्यांना चोरून विक्री करण्याचा सपाटा गेली कित्येक दिवसांपासून सुरू आहे. कडेठाण येथे बेकायदा माती उत्पन्न सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी मंगळवारी (ता. २३) रात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत सदर माहिती मिळाल्या ठिकाणी छापा टाकला. याप्रसंगी शेतजमीन (गट क्रमांक ५२८) मध्ये रात्रीच्या सुमारास जेसीबी मशीनच्या साह्याने बेकायदा माती उत्खनन करून त्याची हायवा वाहनांमधून चोरटया पध्दतीने वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, या प्रकरणी यवत पोलिसांनी विना नंबर प्लेट असलेल्या दोन जेसीबी मशीन व एक हायवा वाहन असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विकास कापरे यांनी फिर्याद दिल्याने हे गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भानुदास बंडगर हे करीत आहेत.