‘तू परत रस्त्यावर दिसली तर…’ बारामतीत महिला सरपंचांच्या अंगावर घातली गाडी; दोघांविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बारामती : बारामती तालुक्यातील जळगाव सुपे ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या मोहन खोमणे यांच्या अंगावर गाडी घालत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (ता.२२ मे) ला घडली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप रमेश खंडाळे आणि अमोल दत्तात्रय जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत
मिळलेल्या माहितीनुसार, कौशल्या खोमणे या सन २०२१ पासून जळगाव सुपे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. निवडणुकीत संदीप खंडाळे यांनी वॉर्ड क्रमांक दोनमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. ते आणि जगताप हे दोघे खंडाळे सरपंच झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांना त्रास देत होते.
तसेच प्रशासनालाही वेठीस धरण्याचा प्रकार सुरू होता. सोमवारी (ता.२२) मे रोजी खोमणे यांच्या शेतात शेंगा झोडण्याचे काम सुरू होते. तेथे गावातील छाया सदाशिव सातपुते, रोहिणी संभाजी करे यादेखील काम करत होत्या. करे यांनी खोमणेंकडे येत खंडाळे आणि जगताप हे दोघे चारचाकीतून आले असून, घराचे आणि शेडचे फोटो काढत असल्याचे सांगितले.
मटण केले नाही म्हणून पतीकडून पत्नीच्या डोक्यात विळ्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना
खोमणे यांनी त्याठिकाणी जाऊन जाब विचारला. त्यावर ते दोघे तात्काळ गाडीत बसून निघून जाऊ लागले. जगताप हा गाडी चालवत होता. तर खंडाळे शेजारी बसला होता. या प्रकारानंतर खोमणे घराकडे परतत असताना पाठीमागून गाडीचा जोरात आवाज आला.
पार्टी करताना साहेबांचा फोन पडला पाण्यात, मग काय तब्बल २१ लाख लिटर पाणी उपसून केली नासाडी
दरम्यान, त्यांनी मागे वळून पाहिले असता त्यांच्याच दिशेने गाडी जोरात येताना दिसली. प्रसंगावधान राखत त्या घरात पळाल्या. तेव्हा या दोघांनी “तू परत रस्त्यावर दिसल्यास गाडीखालीच घालतो”, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानुसार पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दोघांवर दाखल केला आहे.