कामगाराच्या आत्महत्येप्रकरणी लोणी काळभोरमधील इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीच्या सुपरवायझरसह ६ जणांवर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : पत्नीचा विनयभंग केला याप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठांकडे पतीने तक्रार केली. त्याचा राग आल्याने सुपरवायझरसह एकाने पत्नीस कामावरुन काढुन टाकले. त्यानंतर पतीस कामावरुन काढुन टाकण्याची धमकी देवुन मानसिक त्रास दिला. या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ क्लीप रेकॉर्ड करून राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी कंपनीच्या सुपरवायझरसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गारुडी वस्ती परिसरात घडली असून बुधवारी (ता.६) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.
या घटनेत तुकाराम ज्ञानेश्वर भाले (वय ३८, रा. लोणी काळभोर, ता.हवेली) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. यांच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यांवरून सुनिल विजय कसबे (वय ३२), सारिका उर्फ सावित्रा सुनिल कसबे (वय २७), सुनिता विजय कसबे (वय ४७) करण काळु कसबे (वय २२, सर्व रा. गारुडीवस्ती, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे), अक्षय केवट (वय ३०) व अजित सिंग (वय ३०, दोघेही रा. कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार, भाले पती-पत्नी लोणी काळभोर येथील इंडियन ऑईल टर्मिनलमध्ये काम करीत होते. अक्षय केवट हा भाले यांच्या पत्नीस “तु मला आवडतेस, मला तुझ्यासोबत रिलेशन मध्ये राहायचे आहे, याबाबत तुझ्या नवऱ्याला काही देखील कळणार नाहीं” असे म्हणायचा. तिची छेडछाड करून अश्लील बोलायचा. तसेच जवळपास कोणीही नसताना लगट करून विनयभंग करायचा.
सदर प्रकार तिने पतीस सांगितला. तिने व पती तुकाराम भाले यांनी या प्रकाराबाबत कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली. वरिष्ठांकडे तक्रार केल्याने सुपरवायझर अजित सिंग व सुनिल कसबे यांनी पत्नीस कामावरुन काढुन टाकले. तुकाराम भाले यांनाही वारंवार कामावरुन काढुन टाकण्याची धमकी देवुन मानसिक त्रास दिला. या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून तुकाराम भाले यांनी राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी भाले यांनी “मी फाशी घेत आहे. माझा काम धंदा गेला. माझ आख्ख नुकसान झालं, माझा आख्खा पैसा पाणी गेला, या चार पाच जणांनी. मला वाटेला लावलं” अशी व्हिडीओ क्लीप रेकॉर्ड केली आहे. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी व स्वत:चा विनयभंग केल्याप्रकरणी पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील करीत आहेत.