४ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात मागितली तब्बल २ कोटींची लाच; पहिला हप्ता साडे ४६ लाखांचा स्वीकारताना पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआयला अटक…


पिंपरी : शेअर विकल्याचे भासवून तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणुक केलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना मदत करण्यासाठी तब्बल २ कोटींची लाच मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

या २ कोटी रुपयांपैकी पहिला हप्ता स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन पिंपरी चिंचवड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने २७ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी(वय ४४, रा. सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका वकिलांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

बाणेर येथे राहणार्‍या एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला तिघा जणांनी आयसीआयसीआय सिक्युरिटी यांची बनावट कॉन्ट्रक्ट नोट पाठविली. मार्जिन मनीच्या गुंतवणुकीवर टाटा मोटर्स कंपनीचे शेअर फिर्यादी यांना विकल्याचे भासविले. त्यांच्याकडून आरोपींनी त्यांचे वैयक्तिक बँक खात्यात मार्जिन मनीच्या नावाखाली वेळोवेळी ४ कोटी ९७ लाख ५३ हजार ४२० रुपये स्वीकारले. सुरुवातीला ९९ लाख २८ लाख ३३७ रुपये परत देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर रक्कम परत न करता ३ कोटी ९८ लाख २५ हजार ८२ रुपयांची फसवणुक केली होती. हा प्रकार १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२४ दरम्यान बाणेर येथील कंपनीत घडला होता. बावधन पोलीस ठाण्यात २१ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याच्याकडे देण्यात आला होता.

या गुन्ह्यात पोलिसांनी आशिलाच्या वडिलांना अटक केली आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार वकील यांच्या आशिलाला मदत करण्यासाठी व अटक केलेल्या आशिलाच्या वडिलांच्या जामीन अर्जावर से दाखल करण्यासाठी प्रमोद चिंतामणी याने अगोदर तक्रारदाराकडे स्वत:साठी २ लाख रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

या तक्रारीच्या अनुषंगाने २७ ऑक्टोंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यात प्रमोद चिंतामणी याने स्वत:साठी २ लाखांच्या प्राथमिक लाच मागणीमध्ये अचानकपणे वाढ करुन २ कोटी रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. स्वत:साठी व त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक कोटी असे दोन कोटींची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या २ कोटी रुपयांपैकी ५० लाख रुपयांचा पहिला हप्ता लवकरात लवकर देऊन उर्वरित रक्कम टप्प्या टप्प्याने देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर २ नोव्हेबर २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने तक्रारदाराला पहिला हप्ता घेऊन रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिरासमोर बोलावले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा रचला. पहिला हप्ताच्या ५० लाख रुपयांच्या रक्कमेपैकी ४६ लाख ५० रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना चिंतामणी याला रंगेहाथ पकडण्यात आले.

त्याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांच्या सहकार्‍यांनी केली़ पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे अधिक तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!