बारामती पोटनिवडणुकीत माघार घेयच्या काही तास आधी मोठा ट्विस्ट, रोहित पवार अचानक हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला…

बारामती : बारामती पोट निवडणुकीत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आमदार रोहित पवार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला गेले आहेत. यामुळे काँग्रेस उमेदवार माघार घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.

रोहित पवार म्हणाले, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणं ही अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राज्यातील प्रत्येकाची आणि तमाम बारामतीकरांची इच्छा आहे. अजितदादांची बहुतांश राजकीय कारकिर्द ही काँग्रेसमध्ये आणि नंतर काँग्रेससोबत गेली. या काळात काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध राहिला.
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची मुंबईत भेट घेतली आणि अजितदादा, त्यांचं काम आणि त्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध बघता काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती त्यांना केली.

अजितदादांसारख्या एका प्रमुख नेत्याच्या अपघाताचा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल अशा सरकारविरोधात संघर्ष का करु नये? असा स्पष्ट विचार त्यांनी यावेळी मांडला. त्यांच्या या विचारांचा आणि त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा आदर असल्याचे देखील आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे.
तरीही काँग्रेससह अर्ज दाखल केलेल्या इतरही सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन सुनेत्राकाकी यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करावं, अशी माझी या सर्वांना विनंती आहे आणि या विनंतीचा हे सर्वजण आदर ठेवतील, असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.