ऐन निवडणुकीत राजकारणात 2 डिसेंबरनंतर मोठा भूकंप? रवींद्र चव्हाण यांच्या विधानाने खळबळ.

पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी भाजपाकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे.
. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर यावर भाष्य करेन, असं थेट आणि मोठं विधान केलं आहे.

शिवसेनेचे नेते निलेश राणे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांनी बोलणे टाळले आहे. परंतु त्यांनी बोलताना मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे सांगितल्यामुळे 2 डिसेंबरनंतर नेमके काय होणार? महायुतीत पडद्यामागे काही हालचाली होत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मालवण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी बुधवारी सायंकाळी एक खळबळजनक स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी मालवण शहरातील भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात पैशांची बॅग सापडल्याचा एक लाईव्ह व्हिडीओ केला आहे. हे पैसे वाटपासाठी वापरले जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

