राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार तब्बल २१० कोटी…

पुणे : राज्याकडे यावर्षी पावसाने पाठ फिरवली असून शेतकरी चिंतेत आहे. लावलेली पिके जगवायची कशी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एकीकडे गंभीर होत चालला आहे.

तसेच २० ते २५ दिवसापासून पावसाने खंड दिल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. आता जरी नव्याने पेरणी करण्याची वेळ आली तरी पैसे कोठून आणायचे अशी समस्या शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.


याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने मंजूर झालेल्या १५०० कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यात भाजपला बदलत्या सत्ता समिकरणाने ग्रहण! राष्ट्रवादी गटाचे जिल्ह्यात डॅमेज कंट्रोल
पढील शुक्रवार पर्यंत आणखी अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १७८ कोटी २५ लाख रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यावर सध्या दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन चारा खरेदी करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
