धक्कादायक! पुण्यात 9 जणांकडून 31 वर्षीय तरुणाचं अपहरण; निर्जन मैदानात नेऊन विवस्त्र केलं अन्…..,घटनेने उडाली खळबळ

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

याचे संतापजनक उदाहरण कात्रज-कोंढवा रस्त्यावर समोर आले आहे. केवळ आर्थिक वादातून एका ३१ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला विवस्त्र करत अमानुष मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, पीडिताचा व्हिडिओ बनवून त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाला ३१ डिसेंबरच्या रात्री नऊ जणांनी गाठले. जुन्या आर्थिक व्यवहाराचा राग मनात धरून आरोपींनी पीडिताचे कारमधून अपहरण केले.

गोकुळनगर परिसरातील एका निर्जन मैदानात नेऊन आरोपींनी तरुणाला विवस्त्र केले आणि त्याला बेदम मारहाण केली. या अघोरी कृत्याचे त्यांनी मोबाईलवर चित्रीकरण करून, पोलिसात गेल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
दहशत माजवण्यासाठी आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून पीडिताला धमकावले आणि गोळीबारही केला. सुदैवाने, या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावला. या घटनेनंतर प्रचंड दहशतीखाली असलेल्या तरुणाने रविवारी येवलेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक खराडे पसार आरोपींचा शोध घेत आहेत.