नांदेड येथे 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

नांदेड : नांदेड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. आकांक्षा मुंजाजी गायकवाड (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा गायकवाड ही गेल्या दोन वर्षांपासून हडको परिसरातील एका इमारतीत कॉट बेसिसवर सुरू असलेल्या वसतीगृहात राहत होती. हे वसतीगृह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश चिटणीस तथा माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते.

शुक्रवारी दुपारी आकांक्षा वसतीगृहातील तिच्या खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वसतीगृह चालक जीवन घोगरे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून वसतीगृहाची थकीत फीस भरण्यासाठी घोगरे वारंवार तगादा लावत होते. त्यामुळे मुलीला मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली,” अशी तक्रार आकांक्षाचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी पोलिसांकडे दिली.
या तक्रारीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवन घोगरे पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.