तुळजापूरच्या डोंगरावर छत्रपती शिवरायांची 108 फूट प्रतिमा, तब्बल 1865 कोटींचा खर्च, कसं असेल भव्य शिल्प?

तुळजापूर : अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच 108 फूट उंच भव्य ऐतिहासिक शिल्प उभारल जाणार आहे. रामदरा तलावाच्या माथ्यावर असलेल्या डोंगरावर ही भव्य प्रतिमा साकारण्यात येणार आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर व तुळजापूर शहराचा नियोजित विकास साधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यासाठी एकूण 1865 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास आराखड्याच्या अनुषंगाने या डोंगरावर आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वादरूपाने भवानी तलवार देत असल्याची प्रतिमा साकारण्यात येणार असून ऐतिहासिक घटनेवर आधारित असलेले शिल्प भाविकांसाठी अविस्मरणीय असणार आहे.


छत्रपती शिवरायांना भवानी माता तलवार देतानाचे हे शिल्प केवळ एक स्थापत्य घटक नसून राज्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक अस्मितेचे प्रभावी प्रतीक आहे. देवी भवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते स्वराज्य, धर्म, न्याय व लोककल्याणाच्या मूल्यांचे द्योतक असून, या ऐतिहासिक क्षणाचे शिल्परूप दर्शन भाविकांमध्ये श्रद्धा, प्रेरणा व अभिमान निर्माण करेल. हे शिल्प दूरून नजरेस भरणारे ठरणार आहे.
आई तुळजाभवानीच्या डोंगरावर उभारण्यात येणारे हे शिल्प भाविकांच्या दर्शनानुभवाला अधिक स्मरणीय करेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी व्यक्त केला आहे.तलाव परिसरात शिल्प एकरूप दृश्यरूपाने दिसेल, अशी नियोजनबद्ध आखणी करण्यात आली आहे
