दिल्ली-मुंबईत ६२ वर्षांनंतर एकत्र आला मान्सून, जाणून घ्या देशभरातील पावसाची स्थिती

मुंबई : यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने अनेकांची चिंता वाढली होती. असे असताना आता सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. मॉन्सूनची थांबलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे.

देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत ६२ वर्षांनंतर मान्सून पोहोचला आहे. २१ जून १९६१ नंतर पहिल्यांदाच मान्सून दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी दाखल झाला आहे.६२ वर्षांनंतर हे घडत आहे.
मान्सून दिल्लीत दोन दिवस आधी तर मुंबईत दोन आठवडे उशिरा दाखल झाला. त्याच्या प्रभावामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. गेल्या २४ तासात ४० ते ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तर मुंबईत ८६ ते १७६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या बहुतांश भागातही मुसळधार पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि गुजरातच्या कच्छ भागात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
IMD ने रविवारी सांगितले की, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह किनारपट्टी भागात पुढील ४८ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ तासांत दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड ते आसाम आणि ईशान्येकडील सर्व राज्ये, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्रात बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे
मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी झाली.
येत्या दोन दिवसांत पश्चिम आणि उत्तर भारतातील आणखी काही भागात मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.पश्चिम आणि उत्तर भारतातील आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.