मी मोदींचा फॅन!! एलॉन मस्क यांनी केले अमेरिका भेटीत मोदींचे तोंडभरून कौतुक
नवी दिल्ली : टेस्लाचा आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. भारतात गुंतवणूक करण्याविषयी त्यांच्या चर्चा झाल्याचे समजतंय. टेस्लाचा भारतातील कारखाना कुठे उभारणार, यावर वर्षाअखेरीस अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिली.
मोदी हीरो आहेत, त्यांना भारतासाठी खूप काही करायचे आहे, त्यांच्याशी अतिशय व्यापक चर्चा झाली, असेही मस्क म्हणाले. तसेच मी पंतप्रधानांचा फॅन असल्याचे देखील मस्क यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. ते अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील वर्षी मस्क भारत दौऱ्यावर येणार आहेत.
लोटे न्यूयॉर्क पॅलेस हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी भारत भेटीची इच्छा व्यक्त केली. पुढच्या वर्षी भारत दौऱ्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मी पंतप्रधानांचा फॅन असल्याचे सांगत एलॉन मस्क म्हणाले की, मी भारताच्या भविष्याबाबत खूप उत्सुक आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारताकडे अधिक शक्यता आहेत.
पंतप्रधान मोदींना भारताच्या उज्जवल भविष्यासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत. नवीन कंपन्यांबाबत त्यांचा दृष्टिकोन, धोरण उदारमतवादी आहे. मोदीं भारतात नवीन कंपन्यांचे स्वागत खुल्या हातांनी करतात त्यामुळे मी त्यांचा फॅन आहे. असे ते म्हणाले.