जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत शासनाचा मोठा निर्णय; संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, नवा GR जारी


मुंबई : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. आतापर्यंत अंशतः ऑनलाइन पद्धतीने होणारी ही प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला असून, यापुढे ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

नव्या निर्णयानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्जदारांना केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारेच अर्ज सादर करावा लागणार आहे. जात पडताळणी समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन दिलेले ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच असे अर्ज ग्राह्यही धरले जाणार नाहीत.

कागदपत्रेही ऑनलाइन अपलोड करावी लागणार
जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जासोबत जोडावी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे, दस्तऐवजी पुरावे आणि शपथपत्रे ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करावी लागणार आहेत. यासाठी मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रांच्या प्रती स्कॅन करून सादर करणे आवश्यक असेल. यापुढे कागदपत्रांच्या हार्ड कॉपी कार्यालयात जमा करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच अर्जाची प्रिंट काढून समितीच्या कार्यालयात पुन्हा सादर करण्याचीही गरज राहणार नाही.

जात नोंदीसह रहिवासाचा पुरावा आवश्यक
नियम १६ नुसार निर्धारित केलेल्या पुराव्यांपैकी जात नोंदीचा आणि मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासाचा प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक आहे. संबंधित पुरावा उपलब्ध नसल्यास अर्जदाराला स्वयंघोषणापत्र सादर करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार जात पडताळणी समितीला अतिरिक्त पुरावे मागवण्याचा अधिकार असेल.

आधार क्रमांकाशी अर्ज जोडला जाणार
जात पडताळणीसाठीचा अर्ज अर्जदाराच्या आधार क्रमांकाशी जोडलेला असणार आहे. त्यामुळे एका अर्जदाराला केवळ एकच अर्ज दाखल करता येणार आहे. म्हणूनच ऑनलाइन अर्ज भरताना आणि कागदपत्रे अपलोड करताना अर्जदारांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जदारांना काय फायदा होणार?
या निर्णयामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्जदारांना समितीच्या कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही. अर्जाची सद्यस्थिती मोबाईलवरूनच तपासता येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाल्यामुळे मध्यस्थ आणि दलालांमार्फत होणारा हस्तक्षेप कमी होण्यास मदत होईल. सामाजिक न्याय विभागाने नागरिक आणि संबंधित संस्थांना नव्या नियमांची नोंद घेऊन यापुढे केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!