त्या शेतकऱ्यांना पुढील ३ महिने मोफत धान्य, खासगी अनुदानित शाळांसाठी नवा कायदा; कॅबिनेट बैठकीत १४ महत्त्वाचे निर्णय


मुंबई : राज्यातील ३३ जिल्ह्यांमधील डिबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने दरमहा पाच किलो मोफत धान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याशिवाय खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी सर्वसमावेशक कायदा करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत गृह, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, कामगार यांसह विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत एकूण १४ निर्णयांना मंजुरी देण्यात आली.

मंत्रिमंडळ बैठकीतील १४ महत्त्वाचे निर्णय

१. ३३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोफत धान्य

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील, मात्र डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य मिळणार आहे. प्रत्येक व्यक्तीला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू देण्यात येणार आहे. (अन्न व नागरी पुरवठा विभाग)

२. नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटींची तरतूद

नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहा वळण बंधारे उभारण्याचे नियोजन असून, त्यातून परिसरातील सुमारे २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच ११.५० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. (जलसंपदा विभाग)

३. आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांवर कारवाईला वेग

आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद होणार आहे. यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्यास आणि प्रकरणांचा निपटारा ९० दिवसांच्या आत करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. (गृह विभाग)

४. महसूल न्यायालयीन प्रकरणांसाठी नवी प्रणाली

महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. तसेच प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ‘एक जिल्हा, एक अपील’ ही तरतूद लागू होणार आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (महसूल विभाग)

५. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वाढीव निर्वाह भत्ता

आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुधारित दराने भत्ता मिळणार आहे. यामध्ये भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

६. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुविधा

शालार्थ प्रणालीत समाविष्ट असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरबीआयकडे नोंदणीकृत संस्थांमार्फत या सुविधा मिळणार आहेत. (शालेय शिक्षण विभाग)

७. मुद्रांक अधिनियमात सुधारणा

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंबंधीचे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केले जाणार आहे. या सुधारणांमुळे अभिनिर्णय शुल्क आणि अपील शुल्काच्या दरांमध्ये सुसूत्रता येणार आहे. (महसूल विभाग)

८. दोन विद्यापीठांच्या अधिनियमांमध्ये सुधारणा

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक अधिनियम १९९७ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम १९८९ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती, वार्षिक अहवाल आणि लेखे यांसंबंधीच्या परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी या सुधारणा केल्या जाणार आहेत. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

९. खासगी अनुदानित शाळांसाठी स्वतंत्र कायदा

खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी सर्वसमावेशक कायदा करण्यात येणार आहे. यासाठी ‘महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६’ या विधेयकाच्या प्रारूपाला मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक विधिमंडळात सादर केले जाणार आहे. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

१०. माथाडी कामगार आणि खासगी सुरक्षा रक्षक कायद्यात सुधारणा

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (कामगार विभाग)

११. अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीबाबत कायद्यात बदल

राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, २०२१ मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या विधेयकाच्या प्रारूपाला मंजुरी देण्यात आली आहे. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

१२. खासगी अनुदानित आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग

शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांप्रमाणेच खासगी अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांनाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

१३. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमात सुधारणा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधीचा सुधारणा अधिनियम विधिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. (सामान्य प्रशासन विभाग)

१४. मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन

नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!