रोहित पवारांना भाजपकडून निमंत्रण! थेट बैठकीची ऑफर, नेमकं काय घडलं?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणासह डिलिमिटेशन विधेयकावरूनही त्यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आता भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांना थेट बैठकीला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याची तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवारांना बैठकीसाठी निमंत्रण

रोहित पवार हिवाळी अधिवेशनादरम्यान ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, रोहित पवार यांच्या सरकारकडे काही मागण्या असतील, तर त्यांनी बैठकीला यावं. त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. मी त्यांना बैठकीसाठी निमंत्रित करतो.

तसंच, रोहित पवार यांना नेमका राजकीय मोर्चा काढायचा आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बुधवारी त्यांनी आमच्या बैठकीला यावं. बैठकीत समाधान झालं नाही, तर त्यांनी मोर्चा काढावा, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं.

पडिक जमिनींच्या निर्णयावरही स्पष्टीकरण
यावेळी बावनकुळे यांनी तीन वर्षे जमीन कसली नाही, तर ती शासनाच्या व्यवस्थापनाकडे जाण्याच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली. हा निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नसून, मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून ती वर्षानुवर्षे पडिक ठेवणाऱ्यांसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यात काही लोकांनी फार्महाऊस किंवा इतर कारणांसाठी ५० ते १०० एकर जमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र, अशा जमिनी आठ-आठ वर्षांपासून पडिक आहेत. यामुळे कृषी उत्पादनाचं नुकसान होत असून, अशा जमिनी लागवडीखाली आणणं आवश्यक असल्याचं बावनकुळे म्हणाले.
सर्वसामान्य शेतकऱ्यांना नियम लागू नाही
या निर्णयाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांशी कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. स्वतः शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या नियमामुळे कोणताही धोका नाही. ज्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून लॅण्ड बँक तयार केली आहे, त्यांच्यासाठी ही तरतूद असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
अशा जमिनी छोट्या शेतकऱ्यांना भाडेपट्ट्याने देता येऊ शकतात. काही लोकांनी आपल्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढल्याचा आरोपही त्यांनी केला.
एकीकडे रोहित पवार सरकारविरोधात मोर्चाची तयारी करत असताना, दुसरीकडे बावनकुळे यांनी त्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता रोहित पवार या निमंत्रणाला काय प्रतिसाद देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
