३ वर्षे जमीन पडिक ठेवल्यास सरकार ताब्यात घेणार? महसूलमंत्री बावनकुळेंनी केला मोठा खुलासा


मुंबई : राज्यातील पडिक शेतजमिनी सरकारच्या ताब्यात जाणार असल्याच्या चर्चांना आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या जमिनींना कोणताही धोका नसून, मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून ती पडिक ठेवणाऱ्यांसाठी हा निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं.

मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी सुरक्षित

राज्यात १९४८ चा कुळ कायदा लागू असून, त्यानुसार सलग तीन वर्षे जमीन पडिक राहिल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाकडे जाण्याची तरतूद आहे. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, जो मूळ शेतकरी स्वतःच्या जमिनीवर शेती करतो, त्याच्या जमिनीवर या तरतुदीचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही.

५० ते १०० एकर जमीन खरेदी करणाऱ्यांना इशारा

मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून त्यावर फार्महाऊस उभारणारे, मात्र प्रत्यक्ष शेती न करता जमीन पडिक ठेवणाऱ्यांना सरकारचा इशारा असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. काही लोक ५० ते १०० एकर जमीन खरेदी करून लॅण्ड बँक तयार करतात. मात्र, अशा जमिनी शेतीसाठी वापरल्या जात नाहीत. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या जमिनी लागवडीखाली आणणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

पुढील ३ ते ५ वर्षांत पडिक जमिनी लागवडीखाली आणण्याच्या सूचना

कुळ कायद्यातील तरतुदींचा संदर्भ देत, पडिक जमिनी पुढील ३ ते ५ वर्षांत उत्पन्नाखाली आणण्याच्या सूचना देण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. विशेषतः लॅण्ड बँक तयार करून जमीन पडून ठेवणाऱ्यांनी पुढील तीन वर्षांत त्या जमिनीवर लागवड करून उत्पन्न घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

राजू शेट्टी यांच्याशीही चर्चा

या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर राजू शेट्टी यांच्या मनातील संभ्रम दूर झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

एकूणच, सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या जमिनी सुरक्षित असल्याचं स्पष्ट करताना मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून ती पडिक ठेवणाऱ्यांनी शेती सुरू करावी, अशी भूमिका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!