बारामतीत उदय सामंतांची एन्ट्री अन् राजकीय चर्चांना उधाण! पवारांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा नेमका डाव काय? सामंतांनी एका वक्तव्यात स्पष्ट केली भूमिका

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये शिवसेनेच्या हालचाली वाढू लागल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांच्यासह पुणे जिल्ह्याचा संघटनात्मक दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यामुळे बारामतीत शिवसेना नेमकी कोणती राजकीय खेळी करणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. अखेर पत्रकार परिषदेत सामंत यांनी या चर्चांना पूर्णविराम देत आपली भूमिका स्पष्ट केली. बारामतीत कोणाला आव्हान देण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यात पक्षवाढीची जबाबदारी आपल्यावर आणि सचिन अहिर यांच्यावर सोपवली आहे. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाला स्वतःची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, दुसऱ्या पक्षाचे अस्तित्व संपवणे किंवा कोणाला राजकीय आव्हान देणे हा शिवसेनेचा हेतू नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी पुणे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


अजितदादांच्या अपघातावरून महत्त्वाची भूमिका

बारामती दौऱ्यादरम्यान सामंत यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. बारामतीच्या विकासासाठी अजितदादांनी मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच संघटनात्मक दौऱ्यासाठी बारामतीत आल्याने स्मृतिस्थळाला भेट दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, ही एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचे सामंत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. चौकशीचा अहवाल लवकरात लवकर राज्यासमोर यावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, अपघाताच्या चौकशीची मागणी करणे आणि त्यावर राजकारण करणे यात फरक आहे. अपघाताचे राजकारण करणे चुकीचे असल्याचे त्यांनी बजावले. रोहित पवार यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या विटंबनेवरून ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनावरही सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसच्या महाराष्ट्रातील किंवा दिल्लीतील एकाही मोठ्या नेत्याने आदरांजली वाहणारे ट्विट केले नाही. त्यामुळे ठाकरे गटाने काँग्रेसविरोधात आंदोलन करायला हवे होते, अशी टीका त्यांनी केली. संबंधितांनी पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेबांचा फोटो फाडण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसने आदरांजली न वाहिल्याचा मुद्दा झाकण्यासाठी या घटनेचे राजकीय भांडवल केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे गट काँग्रेससोबत गेल्यानेच आपण उठाव केल्याचे सांगत बाळासाहेबांचे विचार आणि त्यांच्याविषयीचा आदर कायम असल्याचे ते म्हणाले.
पुणे जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्रित लढवावी, असे आवाहन सामंत यांनी केले. अजित पवारांना अपेक्षित असलेले सहकार क्षेत्र पुढे न्यायचे असेल, तर बँकेकडे पक्षीय राजकारणातून न पाहता सहकाराच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सहकार क्षेत्रात राजकारण नसावे, अशीही त्यांची भूमिका होती. सातारा जिल्ह्यात महायुतीचे पक्ष स्वतंत्रपणे लढत असले, तरी त्या अपवादाव्यतिरिक्त इतर ठिकाणी महायुती एकत्र काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामतीत २० कोटींचे विश्रामगृह; सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन
अजित पवार यांच्या विकास संकल्पनेनुसार एमआयडीसीने बारामतीत सुमारे २० कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक विश्रामगृह उभारले आहे. पुढील १५ दिवसांत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची वेळ घेऊन त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या विश्रामगृहात अजितदादांचे तैलचित्र लावण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली. इंदापूर येथील एमआयडीसीचे कामही नियोजित कालावधीत पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आंदोलनातील तरुणांच्या कुटुंबीयांना नोकरी
मनोज जरांगे पाटील यांच्याशी एक दिवस आधी चर्चा झाल्याची माहिती देताना सामंत यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना एमआयडीसीमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून या नियुक्त्या केल्या जाणार असून, पुढील काही दिवसांत त्याची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या पक्षाच्या निकालासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने त्यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. वकिलांनी सर्व कागदपत्रे सादर केली असून योग्य न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच बोलणे योग्य ठरेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
