गोकुळमध्ये ‘चोरमन’ नको, ‘चेअरमन’ हवा! विवेकानंद पाटलांचा संघर्ष मोर्चात घणाघाती हल्लाबोल..


कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष आता चांगलाच तापला आहे. गोकुळच्या राजकारणात सरकारकडून थेट हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत समविचारी आघाडीच्या वतीने आज कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात एमपीएससी आंदोलनामुळे चर्चेत आलेले तरुण वक्ते विवेकानंद पाटील यांनीही आपल्या खास शैलीत भाषण करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. ‘गोकुळला चोरमन नको, चेअरमन हवा,’ असे म्हणत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

‘मंत्रालयात बसलेला कंसमामा गोकुळवर लक्ष ठेवून!’

संघर्ष मोर्चाचे नेते सतेज पाटील आणि राजू शेट्टी व्यासपीठावर दाखल झाल्यानंतर विवेकानंद पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी गोकुळच्या कारभारात बाहेरून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. ‘गोकुळच्या नावाने मंत्रालयात बसलेला कंसमामा बोटं मोडत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर भाष्य करताना त्यांनी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील चुयेकर यांना चेअरमन करण्याचा निर्धार केल्याचे सांगितले. मात्र, महायुतीकडून वेगळे राजकीय डावपेच खेळले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शशिकांत पाटील चुयेकर हेच चेअरमन असून, तज्ज्ञ संचालकांच्या माध्यमातून निवडला जाणारा अध्यक्ष हा चेअरमन नसून ‘चोरमन’ असेल, अशी टीका त्यांनी केली.

चंद्रकांत पाटलांना निवडणुकीचे थेट आव्हान

गोकुळच्या सत्तासंघर्षाबरोबरच विवेकानंद पाटील यांनी आपल्या राजकीय भूमिकेवरही भाष्य केले. ‘मी रोहित पवार यांच्यासोबत होतो, तेव्हा मला त्यांचा माणूस म्हटले गेले. शेतकरी संघटनेच्या मोर्चात सहभागी झालो, तर राजू शेट्टींचा माणूस म्हणाले. बाळासाहेबांसोबत होतो, तर सांगलीचा माणूस ठरवले. आता बंटी पाटील साहेबांसोबत असल्याने काँग्रेसचा माणूस म्हणतील. मात्र, मी कोणत्याही पक्षात नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

याचवेळी त्यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट निवडणुकीचे आव्हान दिले. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून निवडणुकीचा अर्ज भरावा आणि आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, असे खुले आव्हान विवेकानंद पाटील यांनी दिले.

दरम्यान, मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही भाषण केले. स्वीकृत संचालकांची संकल्पना कशासाठी आणण्यात आली, यावर त्यांनी भाष्य केले. तसेच स्वीकृत संचालकांना यापूर्वी मतदानाचा अधिकार नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!