पवार कुटुंबात नव्या वादाची चर्चा; पार्थ आणि जय पवारांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?


मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाची जबाबदारी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. मात्र, एकीकडे त्या राजकीय जबाबदारी सांभाळत असताना दुसरीकडे पवार कुटुंबात नव्या वादाची चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांचे पुत्र खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. पवार कुटुंबात यापूर्वी काका-पुतण्यामध्ये मतभेद निर्माण करून शरद पवार आणि अजित पवार यांना वेगळे करण्यात आले. त्याच पद्धतीने आता पार्थ आणि जय या दोन भावांमध्येही राजकीय मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

पार्थ पवारांच्या कार्यशैलीवरून पक्षात नाराजी?

दरम्यान, अजित पवार गटातील काही ज्येष्ठ नेत्यांनी नवी दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीला सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पार्थ पवार यांच्या कार्यशैलीवर पक्षातील काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा असून, या भेटीमुळे पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

‘पार्थ आणि जय यांच्यात मतभेद घडवण्याचा प्रयत्न’

रोहित पवार म्हणाले की, जय पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ आणि जय यांच्यात राजकीय दृष्टिकोनातून मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. भाजपकडून अशा प्रकारचे प्रयत्न होऊ शकतात, असा आरोपही त्यांनी केला.

अजित पवार गटातील जे नेते अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले, ते या दोन्ही भावांमध्ये वाद निर्माण करण्यासाठी मदत करू शकतात, असा दावा रोहित पवार यांनी केला. मात्र, या कथित प्रयत्नांमध्ये छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचा सहभाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेत्यांवरही रोहित पवारांची टीका

अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना रोहित पवार यांनी या नेत्यांना शरद पवार यांनी राजकारणात संधी दिली होती, असे म्हटले. प्रत्येक नेत्याचे स्वतःचे कर्तृत्व असते आणि त्यातूनच ते मोठे होतात; मात्र हे नेते शरद पवार यांच्यासोबतही राहिले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

पुढे अजित पवार यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी त्यांना त्रास दिल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. अजितदादा हयात असताना छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांना वगळता इतर काही नेत्यांकडून त्यांना त्रास झाल्याचे ते म्हणाले.

रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि पवार कुटुंबातील पुढील राजकीय घडामोडींबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पार्थ आणि जय पवार यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपांवर संबंधित नेत्यांची भूमिका समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!