पिंपरी-चिंचवड तिथे काही…; अजितदादांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे भाषणात नेमकं काय म्हणाले?

पिंपरी-चिंचवड : पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची आठवण काढत पिंपरी-चिंचवडच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रोचे उद्घाटन झाले. त्यानंतर पोलीस मुख्यालयाचे भूमिपूजन होत आहे. आजचा दिवस पिंपरी-चिंचवडसाठी सुवर्णक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात पोलिसांसाठी विविध उपक्रम राबवले जात असून, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
‘पिंपरी-चिंचवडच्या विकासात अजित पवारांचा सिंहाचा वाटा’

यावेळी अजित पवार यांची आठवण काढताना शिंदे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी तब्बल २५ वर्षे शहराच्या विकासाचे नेतृत्व केले. त्यांच्या पुढाकारातून शहरात अनेक विकासकामे आणि उपक्रम राबवण्यात आले.

पूर्वी लोक आपण पुण्यात राहतो, असे सांगत असत. मात्र, आता नागरिक अभिमानाने आपण पिंपरी-चिंचवडमध्ये राहतो, असे सांगतात. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडचीही स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.
‘शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घेणार नाही’
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. संकट मोठे असून, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारही पुढे येईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पोलिसांसाठी आधुनिक सुविधा आवश्यक
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडे आधुनिक सुविधा असणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. गुन्हेगारांकडे चांगली वाहने असतात, त्यामुळे त्यांचा पाठलाग करून पकडण्यासाठी पोलिसांकडेही आधुनिक वाहने आणि आवश्यक साधनसामग्री असली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांसाठी सरकार जे काही करते, ते उपकार नसून सरकारचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांची मेहनत आणि कर्तव्यनिष्ठा लक्षात घेणे गरजेचे आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पोलिसांनी आपल्या पगारातून केलेली मदत कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.
पूर्वी पोलीस ठाण्यात जाण्यास नागरिक घाबरत होते; मात्र आता नागरिक विश्वासाने पोलीस ठाण्यात जातात. पोलिसांविषयीची प्रतिमा बदलली असून, नागरिकांना पोलीस आधार वाटू लागले आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी पोलीस दलाच्या कामाचे कौतुक केले.
