फक्त दहावी पास असाल तर तुमच्यासाठी एलआयसीचं मोठं दार उघडलं! पहिल्याच वर्षी दरमहा ७ हजार रुपये, तीन वर्षे मिळणार मानधन; कोणाला मिळणार संधी?

पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, यासाठी पदवी किंवा उच्च शिक्षणाची अट नाही. केवळ दहावी उत्तीर्ण असलेल्या महिलांनाही भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) विमा सखी योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेत निवड झाल्यास पहिल्या वर्षी दरमहा ७ हजार रुपये, तर पुढील दोन वर्षेही ठरावीक मानधन मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग खुला झाला आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांना विमा क्षेत्रात रोजगाराची संधी देणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत विमा योजनांची माहिती पोहोचवण्याची जबाबदारीही विमा सखी पार पाडणार आहेत.

तीन वर्षांत किती मिळणार पैसे?

या योजनेत निवड झालेल्या महिलांना पहिल्या तीन वर्षांसाठी निश्चित मासिक मानधन दिले जाते. पहिल्या वर्षी दरमहा ७ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ६ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५ हजार रुपये मिळतील. याशिवाय विक्री केलेल्या विमा पॉलिसींवर नियमानुसार कमिशनही दिले जाते. ठरवून दिलेले विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास किंवा त्यापेक्षा अधिक व्यवसाय केल्यास अतिरिक्त कमिशन मिळवण्याची संधी असते.

वय आणि शिक्षणाची अट काय?
विमा सखी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय १८ ते ७० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. किमान दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागातील महिलांना विशेष प्राधान्य दिले जाते. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेत सहभागी होता येणार नाही.
प्रशिक्षणही मिळणार; पण एक अट लक्षात ठेवा!
निवड झालेल्या महिलांना एलआयसीकडून सुरुवातीच्या तीन वर्षांत विशेष प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नियमित एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. मात्र, पहिल्या वर्षात विक्री केलेल्या एकूण विमा पॉलिसींपैकी किमान ६५ टक्के पॉलिसी चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांशी योग्य संपर्क ठेवणे आणि त्यांना सेवा देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
या योजनेसाठी इच्छुक महिला एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करताना वयाचा दाखला, पत्त्याचा पुरावा आणि दहावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. नोंदणीची प्रक्रिया आणि अर्जासंबंधीच्या अटी अधिकृत संकेतस्थळावर तपासता येतील.
दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या महिलांनाही विमा क्षेत्रात काम करण्याची संधी देणारी ही योजना आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते. मात्र, अर्ज करण्यापूर्वी पात्रता, मानधन, कमिशन आणि इतर नियमांची अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे.
