लेक लाडकी योजनेचा अर्ज आता घरबसल्या! आदिती तटकरे यांची मोठी घोषणा; अंगणवाडीच्या फेऱ्या वाचणार, अर्जाची प्रक्रियाही सोपी


मुंबई : राज्यातील मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सुरक्षिततेला हातभार लावणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेच्या अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना किंवा पालकांना अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्ष जाऊन अर्ज जमा करण्याची गरज राहणार नाही. महाडीबीटी २.० या संकेतस्थळावरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या बदलाची माहिती दिली.

यापूर्वी योजनेसाठी अर्जदारांना जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज सादर करावा लागत होता. त्यानंतर हे अर्ज प्रकल्प स्तरावर जमा करून पोर्टलवर नोंदवले जात आणि पुढे छाननी व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. या प्रक्रियेत वेळ लागत असल्याने तसेच काही ठिकाणी अंगणवाडी केंद्रे कार्यरत नसल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

आता शासनाने प्रक्रियेची पुनर्रचना करून अर्ज नोंदणीपासून छाननी, मंजुरी आणि लाभ मंजुरीपर्यंतची कार्यवाही ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नवीन कार्यपद्धती तयार करण्यात आली असून, अर्जासोबत द्यावी लागणारी कागदपत्रेही कमी करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अर्जदारांना स्वतः अर्ज भरता येणार असून, त्याची सद्यस्थितीही ऑनलाइन तपासता येणार आहे.

या बदलामुळे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः अंगणवाडी केंद्र उपलब्ध नसलेल्या भागांतील लाभार्थ्यांना अर्जासाठी होणारी धावपळ टाळता येणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातील पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा मिळणार आहे.

लेक लाडकी योजनेतील लाभाची रक्कम यापूर्वीच थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाइन झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीत आणखी सुलभता येणार आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पहिला लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या २ लाख ९८ हजार ६९५ इतकी झाली आहे.

मात्र, अर्ज करताना पात्रतेचे निकष आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अधिकृत पोर्टलवर तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाडीबीटी २.० पोर्टलवर अर्जाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थ्यांना घरबसल्या अर्ज सादर करण्याचा मार्ग खुला होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!