आधी आदित्य ठाकरेंची भेट, त्यानंतर तरुणांना पोलीस ठाण्यात नेलं! सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर मारलं,अन् अंतर्वस्त्र डोक्यावर घातल्याचा आरोप; राम पूर्णेकरांनी सांगितला कथित छळाचा घटनाक्रम


ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यात राजकीय वातावरण तापले असतानाच आता कापूरबावडी पोलीस ठाण्यातील कथित अत्याचाराच्या आरोपांनी नवा वाद निर्माण झाला आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांच्यासोबत अमानुष वर्तन करण्यात आल्याचा गंभीर आरोप राम पूर्णेकर यांनी केला आहे. कपडे काढणे, पट्ट्यांनी मारहाण करणे, अंतर्वस्त्रे एकमेकांच्या डोक्यावर घालणे आणि सूर्यफूल तेलाचा वापर करून संवेदनशील भागांवर मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

गुरुवारी दुपारी आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पूर्णेकर समर्थक असलेल्या काही तरुणांना कापूरबावडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले. अर्जुन पुंदरे या तरुणासह काही जणांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले होते. एका व्यक्तीचा फोटो दाखवून त्याला ओळखता का, एवढीच विचारणा करायची असल्याचे सांगण्यात आले होते, असा दावा संबंधित तरुणांनी केला आहे.

मात्र, पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर परिस्थिती बदलल्याचा आरोप त्यांनी केला. तरुणांचे कपडे काढण्यात आले आणि त्यांना अंतर्वस्त्रेही घालू दिली नाहीत. पोलिसांनी त्यांची अंतर्वस्त्रे काढून एकमेकांच्या डोक्यावर घातल्याचा आरोप अर्जुन पुंदरे याने केल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले. साध्या कपड्यांतील व्यक्ती पोलीस ठाण्यात येऊन पट्ट्यांनी बेदम मारहाण करत असल्याचा दावाही तरुणांनी केला आहे.

सूर्यफूल तेलाचा वापर करून मारहाण?

राम पूर्णेकर यांनी केलेल्या आरोपांमधील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे सूर्यफूल तेलाचा वापर. तरुणांच्या शरीराच्या संवेदनशील भागांवर तेल लावून मारहाण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. एका तरुणाच्या बाबतीत अश्लील स्वरूपाचा छळ झाल्याचा आणि शरीराच्या नाजूक भागात बोट घालण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. या कथित प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी आता पूर्णेकर समर्थकांकडून केली जात आहे.

वकिलामार्फत लेखी तक्रार; कारवाईचे आश्वासन

शुक्रवारी राम पूर्णेकर संबंधित तरुणांना आणि आपल्या वकिलाला घेऊन कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिसांना लेखी अर्ज देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्याचा दावा पूर्णेकर यांनी केला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर तरुणांना ठरवून लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप पूर्णेकर समर्थकांनी केला आहे. मात्र, या कथित मारहाणीबाबत ठाणे पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होते का, आरोपांमागील सत्य काय आहे आणि संबंधितांवर कारवाई केली जाते का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!