अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ९ महिन्यांनी बारामती विमानतळासाठी ६५ कोटींचा निधी मंजूर! धावपट्टीपासून एटीसी टॉवरपर्यंत बदलणार चित्र; पण तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची बाब


बारामती : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे, हे तपासातून समोर आले होते. आता या दुर्घटनेच्या नऊ महिन्यांनंतर राज्य सरकारने विमानतळाच्या विकासासाठी तब्बल ६५ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, धावपट्टीचे नूतनीकरण करण्यापासून स्वतंत्र हवाई वाहतूक नियंत्रण मनोरा उभारण्यापर्यंत अनेक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे विमानतळावरील जुन्या सुविधांचे चित्र बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

२८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीकडे येणारे व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे लिअरजेट ४५ विमान बारामती विमानतळावर अपघातग्रस्त झाले होते. या दुर्घटनेत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन वैमानिक आणि अन्य दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले होते.

नेमकी कोणती कामे होणार?

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी २९ ऑक्टोबर रोजी निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात सध्याच्या धावपट्टीचे नव्याने डांबरीकरण, धावपट्टीच्या टोकाला सुरक्षित मोकळी जागा, जमिनीचे सपाटीकरण आणि संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. यासोबत स्वतंत्र एटीसी मनोरा, तांत्रिक विभागाची इमारत, अग्निशमन केंद्र, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. कामे लवकर सुरू व्हावीत यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याच्या निविदा ३० ऑक्टोबरपासून मागवण्याचे नियोजन आहे.

केवळ एटीसी टॉवर उभारून प्रश्न सुटणार?

विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी या निर्णयातील महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, एटीसी मनोरा बांधणे पुरेसे नाही. तो कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षित आणि परवानाधारक कर्मचारी, अधिकृत कार्यपद्धती, विश्वासार्ह संपर्क यंत्रणा, हवाई क्षेत्राचे नियोजन आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आवश्यक परवानग्या मिळणे गरजेचे आहे. रात्रीच्या सुरक्षित उड्डाणांसाठी विशेष दिशादर्शक दिवे, धावपट्टीवरील प्रकाशयोजना आणि स्वयंचलित हवामान निरीक्षण यंत्रणाही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तपासात समोर आल्या होत्या धक्कादायक त्रुटी!

विमान अपघात तपास ब्युरोच्या प्राथमिक अहवालानुसार, बारामती विमानतळावर स्वतंत्र हवामान निरीक्षण यंत्रणा नव्हती. वाऱ्याची दिशा दर्शवणाऱ्या विंड सॉक्सशिवाय पुरेशी दिशादर्शक साधने उपलब्ध नव्हती. धावपट्टीचे शेवटचे डांबरीकरण मार्च २०१६ मध्ये झाले होते. देखभालीअभावी धावपट्टीवरील खुणा फिकट झाल्या होत्या, तर काही ठिकाणी खडी उखडली होती.

अजित पवार यांच्या अपघातानंतर मे आणि ऑगस्ट २०२६ मध्ये प्रशिक्षणार्थी विमानांच्या अपघटनांमुळेही सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. ९ ऑगस्ट रोजी कार्व्हर एव्हिएशन अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवरून घसरले होते. त्यामुळे ६५ कोटींच्या निधीतून होणारी कामे प्रत्यक्षात कधी पूर्ण होतात आणि बारामती विमानतळाच्या सुरक्षेत किती बदल घडतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!