लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर? ८१ लाख महिलांना १५०० रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांनी काय सांगितले?

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी किंवा कागदपत्रांमधील अडचणींमुळे योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील सुमारे ८१ लाख महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या महिलांना दरमहा मिळणारा १,५०० रुपयांचा सन्माननिधी मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे तसेच तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मुख्यमंत्र्यांचे मोठे आश्वासन

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली कष्टकरी आणि शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीचा मुद्दाही मांडण्यात आला. राज्यातील अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी पूर्ण करता आली नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित पात्र महिलांच्या अडचणी दूर करून त्यांच्या खात्यात सन्माननिधी जमा करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे. त्यामुळे ८१ लाख महिलांना १,५०० रुपयांचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
लाडक्या बहिणींसाठी पोर्टल पुन्हा सुरू होणार?
ई-केवायसीअभावी लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. यासाठी सध्या बंद असलेले पोर्टल पुन्हा सुरू करण्याबाबतही चर्चा असल्याची माहिती समोर येत आहे.
ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात सन्माननिधी जमा झालेला नाही, अशा महिलांच्या अडचणी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.
८१ लाख महिलांना मिळणार दिलासा?
ई-केवायसी आणि कागदपत्रांमधील त्रुटींमुळे लाभ रखडलेल्या महिलांसाठी सरकारकडून प्रक्रिया सुरू झाल्यास मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, ८१ लाख महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आणि पोर्टल नेमके कधी सुरू होणार, याबाबत अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
