पुणे-सोलापूर महामार्गावर काम सुरू असतानाच काळाचा घाला! मातीचा प्रचंड ढिगारा कोसळला, २० वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; एक जण गंभीर जखमी


इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरू असतानाच काळाने घाला घातला. पुलाच्या मातीच्या भरावाचा मोठा भाग अचानक कोसळल्याने दोन कामगार थेट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत एका २० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या कामगाराला सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे घडलेल्या या घटनेने बांधकामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या दुर्घटनेत मशरफुल शेख (वय २०) याचा मृत्यू झाला असून अख्तर (वय २०) हा जखमी झाला आहे. दोघेही मूळचे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी आहेत. पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या कामावर ते मजूर म्हणून कार्यरत होते. घटनेनंतर जखमी अख्तर याला तातडीने इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोकलेन, जेसीबीने हटवला मातीचा ढिगारा; एकाला वाचवले, दुसऱ्याचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, राजवडी येथे महामार्गाच्या सेवा रस्त्याचे काम सुरू होते. याचवेळी पुलाच्या भरावासाठी टाकलेली माती अचानक खचून खाली कोसळली. त्यामुळे जवळ काम करणारे दोन मजूर मातीखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच पोकलेन आणि जेसीबीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आले. माती हटवून दोघांनाही बाहेर काढण्यात आले. मात्र, मशरफुल शेख याचा जीव वाचू शकला नाही.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची घटनास्थळी भेट; दोषींवर कारवाईचा इशारा

दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक विलास नाळे, नगराध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, पंचायत समिती सदस्य दिलीप भिसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास शेळके, गफूर सय्यद, अरबाज पठाण, जाकीर पठाण, विशाल चव्हाण आणि रमेश भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली.

पुलावरील वाहतूक बंद केली असती तर दुर्घटना टळली असती?

या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असते. सेवा रस्त्याचे काम सुरू असताना पुलावरील वाहतूक बंद करून ती सेवा रस्त्यावरून वळवली असती, तर ही दुर्घटना घडली नसती, असा दावा स्थानिकांनी केला आहे.

पुलावरून सुरू असलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या कंपनांचा मातीच्या भरावावर परिणाम झाला आणि मातीचा मोठा भाग कोसळला, असा आरोप करण्यात येत आहे. मातीच्या ढिगाऱ्याला हात लावू नका आणि पुलावरील वाहतूक थांबवा, असे वारंवार सांगूनही संबंधित ठेकेदाराने सूचना ऐकल्या नाहीत, असा गंभीर आरोप काँग्रेस तालुकाध्यक्ष निवास शेळके आणि रमेश भोसले यांनी केला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, वाहतूक बंद का करण्यात आली नाही आणि मातीचा भराव कोसळण्यामागे नेमकी कोणती कारणे होती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कृषिमंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्याने आता चौकशीतून काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!