मेहुण्याच्या प्रेमात बहिणीचाच अडथळा? घरात सापडला ३४ वर्षीय जेबांचा मृतदेह; पती अन् बहिणीच्या चौकशीत हत्येचं भयानक गूढ उलगडलं!


रामगढ झारखंड : बहिणीच्या पतीसोबत कथित प्रेमसंबंध, घरात सतत होणारे वाद आणि त्यातून घडलेलं भीषण हत्याकांड! झारखंडच्या रामगढ जिल्ह्यातील ३४ वर्षीय जेबा परवीन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. १७ ऑक्टोबर रोजी जेबा यांचा मृतदेह घरात आढळल्यानंतर सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासातून या मृत्यूमागे हत्येचा कट असल्याचा धक्कादायक दावा समोर आला. या प्रकरणी जेबा यांचे पती गुलाम सरवर ऊर्फ राजन आणि त्यांची बहीण नेहा परवीन यांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं त्या दिवशी काय घडलं?

१७ ऑक्टोबर रोजी जेबा घरात एकट्याच होत्या. त्यांचा १४ वर्षांचा मुलगा आणि १२ वर्षांची मुलगी शिकवणीसाठी बाहेर गेले होते, तर पती गुलाम सरवर कामानिमित्त रांचीला गेल्याचं सांगण्यात आलं. घरात दरोडा किंवा जबरदस्तीने प्रवेश केल्याच्या खुणा दिसत नसल्याने जेबा घसरून पडल्या असाव्यात आणि डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त झाली.

मात्र, जेबा यांच्या भावाने हत्येची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. न्यायवैद्यक पथकाची मदत घेण्यात आली आणि वैद्यकीय मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तपासाला वेग आला.

पती आणि बहिणीच्या संबंधांचा संशय

तपासादरम्यान गुलाम सरवरच्या जबाबातील विसंगती पोलिसांच्या लक्षात आल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत गुलाम सरवर आणि नेहा परवीन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कथित प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या संबंधांमुळे घरात वारंवार वाद होत असल्याचा दावाही करण्यात आला.

जेबांचा मृत्यू कसा झाला?

पोलिसांच्या माहितीनुसार, जेबा यांना मार्गातून हटवण्याच्या उद्देशाने कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. हत्येच्या दिवशी जेबा यांचं डोकं वारंवार भिंतीवर आपटून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती एसडीपीओ आलोक रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

दोन मुलांच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं

या घटनेमुळे जेबा यांच्या १४ वर्षांच्या मुलासह १२ वर्षांच्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जेबा यांचे मामा मोहम्मद संजर यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुलाम सरवर आणि नेहा परवीन यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. संशयास्पद मृत्यू म्हणून सुरू झालेल्या या प्रकरणातून कथित प्रेमसंबंध आणि हत्येचा कट समोर आल्याने रामगढमध्ये खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!