१५ हजार सभासदांची ताकद, ३२०० कोटींची उलाढाल अन् संचालकपदी एकच नाव! महेश गायकवाड यांची बिनविरोध निवड कशी झाली?

लोणी काळभोर : दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकपदी सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने त्यांची सर्वसाधारण गटातून संचालकपदी निवड निश्चित झाली.

सन १९२० मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण तसेच विविध पोलीस विभागांतील सुमारे १५ हजार १९३ सभासद आहेत. संस्थेचे अधिकृत भागभांडवल सुमारे ३३० कोटी रुपये असून, वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ३२०० कोटी रुपये आहे. सभासदांसाठी २० लाख रुपयांचे अपघात विमा सुरक्षा कवच आणि तीन लाख रुपयांची कॅशलेस विमा पॉलिसी असे उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.
संस्थेच्या १३ संचालकांपैकी एका संचालकाचे सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झाल्याने अध्यासी अधिकारी सुभाष काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अनिल भोंग, उपाध्यक्ष सुमित कदम, खजिनदार दिनेश गडांकुश, सचिव जमीर तांबोळी यांच्यासह संचालक मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.


महेश गायकवाड यांनी यापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम विभागात उल्लेखनीय काम केले आहे. सध्या ते दहशतवादविरोधी शाखेत (एटीएस) कार्यरत आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले आहे.
गायकवाड यांच्या पोलीस दलातील अनुभवाचा आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचा संस्थेला लाभ होईल, असा विश्वास अध्यक्ष अनिल भोंग यांनी व्यक्त केला. संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासह सभासदांच्या हक्कांसाठी प्रामाणिक आणि गतिमान प्रशासन देण्याची ग्वाही नवनिर्वाचित संचालक महेश गायकवाड यांनी दिली. त्यांच्या निवडीबद्दल पोलीस अधिकारी, अंमलदार, संस्थेचे पदाधिकारी आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
