पुणे पदवीधरमध्ये डॉ. स्मिता जाधव तर शिक्षकमध्ये सचिन सानप एक्झिट पोलचा अंदाज ; राज्यात महायुतीचेच पारडे राहणार जड …!!


मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांच्या निवडणुकीनंतर राजकीय निकालाचे चित्र काय असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलने महायुतीला चार जागांवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला एका जागेवर यश मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भाजपला दोन, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, हे प्राथमिक अंदाज असून अंतिम निकालातूनच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात सुमारे ३ लाख ८८ हजार मतदार आहेत. एक्झिट पोलने डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपने केलेला आक्रमक प्रचार, पक्षाचे मजबूत संघटन आणि मतदारांशी थेट संपर्क साधण्याची रणनीती याचा फायदा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, हर्षदा देशमुख यांनीही निवडणुकीत आव्हान उभे केले होते.

अमरावती शिक्षक मतदारसंघात मात्र महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसच्या आदिती पोहरे संभाव्य विजयी उमेदवार ठरू शकतात. या जागेवर महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे किरण सरनाईक निवडणूक लढवत होते. मात्र, भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत बंडखोरीमुळे त्यांच्यासमोर चार बंडखोर उमेदवारांचे आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे या मतदारसंघातील लढत विशेष चर्चेत राहिली.

पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत सचिन सानप विजयाचे दावेदार मानले जात आहेत. तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सतीश चव्हाण पुन्हा विजय मिळवण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजामुळे महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र समोर आले असले, तरी अमरावतीतील संभाव्य धक्का आणि पुण्यातील चुरशीची लढत यामुळे अंतिम निकालाबाबत उत्सुकता कायम आहे. पाचपैकी चार जागांवर विजय मिळवण्याचा महायुतीचा अंदाज प्रत्यक्षात खरा ठरणार की निकालात वेगळेच राजकीय चित्र दिसणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!