बारामतीत प्रसिद्ध रुग्णालयातील डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा; ‘छातीत धडधड होतंय का?’ म्हणत स्पर्श केल्याचा महिलेचा आरोप


बारामती : बारामती शहरात दोन वेगवेगळ्या घटनांनी खळबळ उडाली आहे. पोटदुखीच्या उपचारांसाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेने डॉक्टरांविरोधात गैरवर्तनाची तक्रार केली असून, त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यामागे स्वतःच कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणात तिसऱ्या आरोपीच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

व्यायाम सांगण्याच्या बहाण्याने जवळ आल्याचा आरोप

बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला १९ ऑक्टोबर रोजी पोटदुखीचा त्रास होत असल्याने एका नामांकित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. सलाईन संपल्यानंतर डॉक्टरांनी तिला केबिनमध्ये बोलावले. यावेळी तिच्यासोबत लहान मुलगाही होता. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला पाठीसंबंधित व्यायामाच्या हालचाली करण्यास सांगितले.

महिलेच्या तक्रारीनुसार, व्यायाम सुरू असताना डॉक्टर वारंवार तिच्या जवळ येत होते. तिने अंतर ठेवण्यास सांगूनही ते पुन्हा जवळ आल्याचा आरोप आहे. हात मागे ताणण्याची हालचाल करत असताना डॉक्टरांनी तिच्या कमरेला स्पर्श केला आणि ‘छातीत धडधड होत आहे का?’ अशी विचारणा केली, असे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे अस्वस्थ झाल्याने तिने पुढील व्यायाम करण्यास नकार दिला आणि औषधे देण्याची विनंती केली. त्यानंतर ती घरी परतली.

‘पुन्हा असं होणार नाही’, डॉक्टरांनी संदेश पाठवल्याचा दावा

घरी गेल्यानंतरही या घटनेचा मानसिक त्रास होत असल्याचे महिलेने सांगितले. दसऱ्याच्या दिवशी डॉक्टरांनी व्हॉट्सॲपवर शुभेच्छा पाठवल्यानंतर महिलेने त्यांना संदेशाद्वारे त्या दिवशीच्या वर्तनाबाबत जाब विचारला. त्यावर डॉक्टरांनी माफी मागत ‘पुन्हा असं होणार नाही’, असा संदेश पाठवल्याचा दावा तिने केला आहे. नोकरीनिमित्त बाहेर असलेले पती बारामतीत परतल्यानंतर महिलेने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून संबंधित डॉक्टरांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!