दिल्लीतील शाळेत १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; तीन पानी चिठ्ठीमुळे गूढ वाढलं, गार्ड रूममागे आढळला जळालेला मृतदेह

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील एका सरकारी शाळेत बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेतील सुरक्षा रक्षकांच्या खोलीमागे तिचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, विद्यार्थिनीकडे तीन पानांची चिठ्ठी सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मात्र, या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही.

ही घटना शाहदरा जिल्ह्यातील कृष्णा नगर परिसरातील एका सरकारी शाळेत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक, अग्निशमन दल आणि गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने परिसराची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. विद्यार्थिनीचे दप्तर आणि अन्य काही वस्तूही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनी शाळेत येताना एका बाटलीत रासायनिक पदार्थ किंवा पेट्रोलसदृश ज्वलनशील द्रव घेऊन आली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दाव्याला पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांची तपासणी सुरू असून, नेमका घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.


या प्रकरणात सर्वाधिक लक्ष वेधणारी बाब म्हणजे विद्यार्थिनीकडे आढळलेली तीन पानी चिठ्ठी. या चिठ्ठीत काय नमूद आहे, तिने हे टोकाचे पाऊल का उचलले आणि त्यामागे काही विशिष्ट कारण होते का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिसांनी चिठ्ठीतील मजकूर सार्वजनिक केलेला नाही. त्यामुळे तपासातून कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे शाळेच्या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थी आणि पालकांमध्येही अस्वस्थता आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, जप्त केलेल्या वस्तू आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, ही घटना कोणत्या परिस्थितीत घडली आणि चिठ्ठीतून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
