आधी कारने धडक दिली, नंतर दांडक्याने डोके ठेचले; बालमित्राची निर्घृण हत्या करून थेट पोलीस ठाणे गाठले, छत्रपती संभाजीनगर हादरले!


छत्रपती संभाजीनगर : भरवस्तीत, शेकडो नागरिकांसमोर एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे. आधी कारने दुचाकीला धडक देत तरुणाला खाली पाडले, त्यानंतर लाकडी दांडक्याने डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेनंतर संशयित आरोपी थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि “मी हत्या करून आलोय,” असे सांगत पोलिसांसमोर हजर झाला. व्यावसायिक वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक तपासातील दावा आहे.

मृत तरुणाचे नाव देवेश ऊर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (वय ३७, रा. एन-७) असे आहे, तर पवन दिलीप पाराशर हा या प्रकरणातील संशयित आरोपी आहे. दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते. स्थानिक हॉटेल आणि बार यांना सुरक्षा पुरवण्याचा व्यवसाय ते एकत्र करत होते. मात्र, या व्यवसायातून दोघांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा निर्माण झाली होती. त्यातूनच जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.

वर्दळीच्या रस्त्यावर पाठलाग करून हल्ला

गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बंटी दुचाकीवरून घरी परतत असताना बजरंग चौक ते बळीराम पाटील चौकादरम्यान ही घटना घडली. संशयित पवनने कारने बंटीच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेने बंटी रस्त्यावर फेकला गेला. त्यानंतर संशयिताने कार वळवून पुन्हा घटनास्थळी येत कारमधून लाकडी दांडा काढला. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या बंटीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर त्याने सलग चार ते पाच मिनिटे वार केल्याचे वृत्त आहे. गंभीर दुखापती आणि मोठ्या प्रमाणातील रक्तस्रावामुळे बंटीचा मृत्यू झाला.

सिडको पोलीस ठाण्यापासून सुमारे ६५० मीटर अंतरावर, मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

“मी हत्या करून आलोय”; संशयिताचे आत्मसमर्पण

हल्ल्यानंतर संशयित पवन कारने थेट सिडको पोलीस ठाण्यात गेला. तेथे “मी हत्या करून आलोय,” असे सांगत त्याने आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

रोहित पवारांचा कायदा-सुव्यवस्थेवर सवाल

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवरून संताप व्यक्त केला. भरदिवसा दुचाकीस्वार तरुणावर कारने धडक देऊन हॉकी स्टिक आणि लोखंडी सळईने वार करत हत्या झाल्याचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. सामान्य नागरिकांचे जीव जात असताना सरकारने आणखी किती काळ हे सहन करायचे, असा सवालही त्यांनी केला. या घटनेमुळे शहरातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!