महाराष्ट्रात हवामानाचा उलटफेर! पावसाऐवजी उन्हाचा तडाखा; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : ऑक्टोबर महिना संपत आला असतानाही महाराष्ट्रातील उष्णता आणि दमट हवामानाचा त्रास कायम आहे. हवामान विभागाने आज उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर राज्यातील उर्वरित बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
कोकणात उकाड्याचा इशारा; काही भागांत पावसाची शक्यता


कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज असून, या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
उत्तर महाराष्ट्रात कोरडे हवामान
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता नसून, बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे सावट
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या विभागात आज पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
विदर्भासाठी कोणताही अलर्ट नाही
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने कोणताही विशेष इशारा जारी केलेला नाही. या भागात प्रामुख्याने सामान्य हवामान राहण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; चक्रीवादळाची शक्यता
दरम्यान, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, ही हवामान प्रणाली आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या प्रणालीची तीव्रता वाढल्यास येत्या सोमवारी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय, दक्षिण केरळ आणि लगतच्या अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या हवामान प्रणालींमुळे देशातील काही भागांतील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या ताज्या अंदाजाकडे लक्ष ठेवावे.
