पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही मटका जुगार चालवणारा दोन वर्षांसाठी हद्दपार!


लोणी काळभोर, ता. २२ : लोणी काळभोर परिसरात बेकायदेशीर मटका जुगाराचा धंदा चालविणाऱ्या सराईत आरोपीवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्वाला रघुनाथ शेलार (वय ३८, रा. बौद्धवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) याला पुणे शहर पोलिसांनी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही अवैध धंदे सुरू ठेवल्याने त्याच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टोळीगुन्हेगार, अवैध जुगार आणि अंमली पदार्थांच्या विक्रीसह विविध बेकायदेशीर धंद्यांत सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत.त्यानुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगाराचा अवैध व्यवसाय करणारा ज्वाला शेलार याच्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो वारंवार बेकायदेशीर मटका जुगाराचा व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याचे नमूद करीत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपआयुक्त परिमंडळ सहा यांच्याकडे पाठविला होता.या प्रस्तावाची दखल घेत पोलीस उपआयुक्त जीवन बेनीवाल यांनी शेलार याला दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. परिसरातील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त जीवन बेनीवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, पोलीस हवालदार विलास शिंदे, महिला पोलीस हवालदार स्वाती पिसाळ आणि पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे यांनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!