पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निर्णय; दूध खरेदी दरात प्रतिलिटर आणखी १ रुपयाची वाढ…

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेत दूध खरेदी दरात प्रतिलिटर आणखी १ रुपयाची वाढ केली आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही दरवाढ २१ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे यांनी दिली.

गेल्या सव्वा महिन्यात कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ११ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रतिलिटर १ रुपयाने दरवाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एक रुपयाची वाढ केल्याने दूध उत्पादकांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ झाली आहे.
गायीच्या आणि म्हशीच्या दुधाचे नवे दर किती?


नवीन दरानुसार, ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४३ रुपये खरेदी दर मिळणार आहे. तर ६.० फॅट आणि ९.० एसएनएफ असलेल्या म्हशीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ५५ रुपये २० पैसे इतका झाला आहे.
पशुखाद्य आणि वाहतूक खर्चात वाढ
पशुखाद्य, वैरण तसेच वाहतूक खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने दूध उत्पादनाचा खर्चही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे संघाकडून सांगण्यात आले.
सव्वा महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ
कात्रज डेअरीने सप्टेंबरपासून आतापर्यंत तीन वेळा दूध खरेदी दरात वाढ केली आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चाचा काही प्रमाणात सामना करण्यास मदत होणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दरवाढीमुळे पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
