टायगर श्रॉफच नव्हे, तर बॉलिवूडचे ‘हे’ बडे अभिनेते होते निशाण्यावर! रेकीही केली, पण ऐनवेळी प्लॅन बदलला; धक्कादायक खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुंबई गुन्हे शाखा आणि कोटा पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी महत्त्वाची माहिती दिल्याचे समोर आले आहे.

टायगर श्रॉफला लक्ष्य करण्यापूर्वी हल्लेखोरांच्या निशाण्यावर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, आमीर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यासह अनेक बडे कलाकार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या घराबाहेरील कडक सुरक्षा व्यवस्था पाहून आरोपींनी आपला प्लॅन बदलल्याचा दावा तपासात करण्यात येत आहे.
टायगर श्रॉफला का बनवलं लक्ष्य?


मिळालेल्या माहितीनुसार, रिहान, ऋतिक आणि फूल सिंह या आरोपींनी टायगर श्रॉफला लक्ष्य करण्यापूर्वी अमिताभ बच्चन, आमीर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी केली होती. या रेकीचे व्हिडिओ लॉरेन्स गँगचा कथित हँडलर अनिल पंडित याला पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, संबंधित कलाकारांच्या घराबाहेरील कडक सुरक्षा व्यवस्था पाहून आरोपींनी हा प्लॅन सोडून दिला. त्यानंतर तुलनेने कमी सुरक्षा असलेल्या प्रसिद्ध कलाकाराला लक्ष्य करण्याचा विचार करण्यात आल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर टायगर श्रॉफला लक्ष्य करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.
सात दिवस रेकी केल्यानंतर टायगरच्या कारवर गोळीबार
तपासातील माहितीनुसार, टायगर श्रॉफ दर रविवारी सायंकाळी फुटबॉल खेळण्यासाठी येतो, याची माहिती आरोपींनी मिळवली होती. त्याच्यासोबत केवळ चालक असतो, असा त्यांचा समज होता. यानंतर आरोपींनी सलग सात दिवस रेकी केल्याचा दावा करण्यात आला आहे.
ठरलेल्या दिवशी आरोपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला. आरोपींनी गुगलवरूनही टायगरबाबत माहिती मिळवल्याचे सांगितले जात आहे. सेल्फी घेण्याच्या बहाण्याने कारजवळ पोहोचून हल्ला करण्याची त्यांची योजना होती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, पार्कबाहेर गर्दी असल्याने त्यांनी थेट गोळीबार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींसोबत असलेला चौथा साथीदार हल्ल्याच्या आदल्या रात्री सिगारेट ओढण्याच्या बहाण्याने तेथून पळून गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
शस्त्रं पुरवणाऱ्या चौघांना अटक; दोन महिलांचाही समावेश
टायगर श्रॉफवरील गोळीबारासाठी शस्त्रे पुरवल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये सोनीपत येथील कुणाल (२१), सुमित (१९), राधा (२३) आणि बबिता (२३) यांचा समावेश आहे.
तपासातील माहितीनुसार, राधा आणि बबिता या दोघी ट्रेनमधून शस्त्रे घेऊन मुंबईत आल्या होत्या. मुंबईत त्यांनी ही शस्त्रे लॉरेन्स टोळीच्या कथित हँडलरकडे सोपवल्याचा आरोप आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान त्यांना अटक करण्यात आली.
या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांचा तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळवला आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, गोळीबारासाठी शस्त्रे कोणी पुरवली आणि या संपूर्ण कटात आणखी कोण सहभागी होते, याचा तपास सुरू आहे. तपास पुढे सरकत असताना या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
