ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात ऐनवेळी मोठा ट्विस्ट? राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वरील एन्ट्रीबाबत महत्त्वाच्या नेत्याचा मोठा दावा!

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात यंदा राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळणार का? शिवाजी पार्कवरील ‘शिवतीर्था’वर राज ठाकरे अचानक हजेरी लावू शकतात, असा दावा ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे खरोखरच मेळाव्याला आले, तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमुळे या मेळाव्याचे महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या उपस्थितीबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून शिवसैनिक मुंबईत दाखल होत असून, उद्धव ठाकरे यंदा आपल्या भाषणातून कोणता राजकीय संदेश देणार आणि कोणत्या घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘रेजीम चेंज’ अर्थात सत्ताबदलाचा संदेश दिला जाण्याची शक्यता व्यक्त केल्याने मेळाव्याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
वसंत मोरे यांच्या दाव्याने चर्चांना उधाण


वसंत मोरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांच्या संभाव्य उपस्थितीबाबत महत्त्वाचे विधान केले. राज ठाकरे अचानक शिवतीर्थावर येऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. राज ठाकरे मेळाव्यात आले, तर उपस्थितांना विचारांचे सोने लुटायला मिळेल, असेही मोरे म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ऐनवेळी काही अनपेक्षित घडामोड घडणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
दरम्यान, वसंत मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावरही टीका केली. शिवाजी पार्कवरील मेळावाच खरा दसरा मेळावा असल्याचे सांगत त्यांनी नेस्को केंद्रातील मेळाव्यावर निशाणा साधला. तेथील मेळावा गद्दारांचा असल्याची टीकाही त्यांनी केली.
दोन्ही ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार?
राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार का, हा सध्या चर्चेचा मुख्य विषय आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे वसंत मोरे यांचा दावा प्रत्यक्षात उतरणार का, हे मेळाव्याच्या वेळीच स्पष्ट होईल.
यंदाचा दसरा मेळावा संविधानाच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रित असेल, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कोणत्या मुद्द्यांवरून हल्लाबोल करतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. राज ठाकरे यांच्या संभाव्य उपस्थितीच्या चर्चेमुळे मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असली, तरी अधिकृत पुष्टी होईपर्यंत त्यांच्या आगमनाबाबतचा दावा शक्यतेपुरताच मानावा लागणार आहे.
