“जळता चिराग मेरा… हवा जरा तेज चल रही है!” धनंजय मुंडेंचा शायरीतून नेमका कुणाला इशारा? पंकजा मुंडेंनीही भगवान गडावरून दिला संघर्षाचा संदेश!


बीड : गेल्या काही काळापासून राजकीय टीकेचा सामना करणारे धनंजय मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात शेरोशायरीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. “कई दिनों से हवा जरा तेज चल रही है,” या ओळींचा उल्लेख करत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सूचक भाष्य केलं. दुसरीकडे, पंकजा मुंडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची ग्वाही देत कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचं आवाहन केलं. त्यामुळे यंदाच्या विजयादशमी मेळाव्यात दुष्काळासोबतच मुंडे बंधू-भगिनींच्या भाषणांचीही चर्चा रंगली.

“अडीच वर्षांपासून गप्प आहे…” धनंजय मुंडेंचं मौन चर्चेत

धनंजय मुंडे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून आपण शांत आहोत. मागील दसरा मेळाव्यात बोलल्यानंतर आपण कुठेही व्यक्त झालो नाही. प्रत्येक वेळी बोलण्यापेक्षा काही प्रसंगी शांत राहणं अधिक महत्त्वाचं असतं, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“कभी कभी खामोशी भी लफ्जों के ताकद से बड़ी होती है,” असं म्हणत त्यांनी मौनाचा अर्थ स्पष्ट केला. तसेच, “आपली नियत साफ असली की वक्तही उनको नियती बता देती है,” या शब्दांत त्यांनी वेळच योग्य उत्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला. काही जण हिशोब करत राहतात, असं सांगतानाच त्यांनी गेल्या काळातील टीका-टिप्पणीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं.

राहत इंदोरींच्या शायरीतून विरोधकांना टोला?

आपल्याला बरंच काही सहन करावं लागल्याचं सांगत धनंजय मुंडे यांनी प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांच्या शायरीचा आधार घेतला.

“जलता चिराग मेरा, हवा मचल रही है, कई दिनों से हवा जरा तेज चल रही है,” या ओळी त्यांनी ऐकवल्या. तसेच, “कुछ महफिले ऐसी बैठी है मेरी तबाही के लिए, उन्हें मालूम ही नहीं हवा रुख बदल रही है,” असं म्हणत आपल्या अडचणींवर आनंद व्यक्त करणाऱ्यांना परिस्थिती बदलू शकते, असा सूचक संदेश दिला. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला वाव मिळाला.

पंकजा मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द; म्हणाल्या, दुःखात मीही सहभागी होईन!

भगवान गडावरील मेळाव्यात पंकजा मुंडे यांनीही दमदार भाषण केलं. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना एकटं पडू देणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपण सुख-वैभवात जगत असलो, तरी जनतेच्या वाट्याला दुःख आलं तर आपणही ते दुःख भोगू, असं त्या म्हणाल्या. जाती-पातीचं राजकारण करून कोणताही नेता मोठा होत नाही, असं सांगत त्यांनी सामाजिक एकतेचाही संदेश दिला.

दुष्काळ आणि उन्हामुळे दसरा मेळावा कसा होणार, अशी चर्चा सुरू असताना त्यांनी संघर्षाचं महत्त्व अधोरेखित केलं. “जिंदगी में तपिश भी बहुत जरूरी है, क्योंकि अक्सर वे पौधे मुरझा जाते हैं जिनकी परवरिश हमेशा छांव में होती है,” या शायरीतून त्यांनी संकटांचा सामना करण्याची प्रेरणा दिली. “ठोकरें कहती हैं मारा जाएगा, हौसले कहते हैं देख लेंगे,” असं म्हणत त्यांनी जिद्द आणि आत्मविश्वासाचा संदेश दिला.

“एक सितारा टूटने से फलक सूना नहीं होता”

पंकजा मुंडे यांनी आणखी एका शायरीतून कार्यकर्त्यांना धीर दिला. “चलते रहेंगे काफिले मेरे, बगैर मेरे भी यहाँ, एक सितारा टूटने से, फलक सूना नहीं होता,” असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचं आवाहन केलं. “तुम्ही माझ्या आस्मानातले तारे आहात. सदैव चमकत राहा आणि धीर धरा, मी तुमच्या पाठीशीच आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं.

दुष्काळाच्या सावटात राजकीय भाष्य

यंदाच्या विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळाचा प्रश्न ऐरणीवर आहे. विरोधकांकडून सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली जात आहे, तर सरकारकडून दुष्काळग्रस्तांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचं सांगितलं जात आहे. अशा वातावरणात भगवान गडावरील मेळाव्यात मुंडे बंधू-भगिनींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. धनंजय मुंडेंची शायरीतून झालेली टोलेबाजी आणि पंकजा मुंडेंनी दिलेला शेतकऱ्यांच्या साथीचा शब्द यामुळे मेळाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!