मनोज जरांगे पाटील यांच्या ३ मोठ्या घोषणा; सरकारची डोकेदुखी वाढणार? नेमकं काय म्हणाले?


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बीडमधील नारायण गडावर दसरा मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या.

मराठा समाजातील तरुणांना संघटित करण्यापासून ते कुणबी प्रमाणपत्रांच्या अडचणी सोडवण्यापर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी थेट इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी हजारो मराठा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना समाजाच्या एकजुटीवर भर दिला. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत असल्याचे सांगत समाजातील तरुणांचे भविष्य आणि मुलांचे हित महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील विविध पक्षांतील मराठा नेत्यांवर संकट आले, तर समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो. मात्र, समाजाने या नेत्यांना साथ दिली नाही, तर त्यांना तुरुंगात जावे लागू शकते, असे वक्तव्यही जरांगे यांनी केले. समाजातील मुलांनी मोठे झाले पाहिजे आणि समाजाचे नुकसान झाले, तर सर्वांनाच त्याची किंमत मोजावी लागेल, असे ते म्हणाले.

प्रत्येक घरातून मराठा सेवक तयार करण्याचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातील पहिल्या घोषणेत प्रत्येक घरातील तरुणाने मराठा सेवक म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले. विजयादशमीनंतर २२ तारखेला यासाठी मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या क्रमांकावर मराठा सेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठवावा. मात्र, संबंधित क्रमांकावर फोन करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. मराठा समाजातील प्रत्येक घरातून सेवक तयार व्हावा आणि समाजाने या सेवकांच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘कोणता अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, ते बघतोच!’

कुणबी नोंदी सापडूनही अनेकांना प्रमाणपत्र मिळत नसल्याचा मुद्दा जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. अर्ज स्वीकारले जात नाहीत, अर्ज करूनही कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही आणि वैधता प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येतात, अशा तक्रारी त्यांनी मांडल्या.

या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक दिला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या क्रमांकावर केवळ आरक्षणाशी संबंधित अडचणी आणि तक्रारी पाठवाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘कोणता अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, ते बघतोच आम्ही,’ असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा समाजाच्या अडचणींसाठी स्वतंत्र क्रमांक

जरांगे पाटील यांनी तिसऱ्या घोषणेत मराठा समाजाच्या विविध अडचणी मांडण्यासाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक देण्याची माहिती दिली. समाजातील नागरिकांना त्यांच्या समस्या या क्रमांकावर पाठवता येणार आहेत. मात्र, या क्रमांकावर फोन न करता केवळ समस्या नोंदवाव्यात, असे त्यांनी सांगितले.

या तीन घोषणांच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना संघटित करणे, कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षणासंबंधीच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच समाजाच्या इतर समस्या एकत्रितपणे समोर आणणे, यावर जरांगे पाटील यांनी भर दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!