SBI ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी; ३.७५ लाख खात्यांचा डेटा लीक झाल्याचा दावा, नेमकं प्रकरण काय?


नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या ३.७५ लाख ग्राहकांचा डेटा लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘सिरियससिम’ नावाच्या हॅकर ग्रुपने ३ लाख ७५ हजार अकाउंट्सचा तपशील आणि २,७२२ पीडीएफ फाइल्स मिळवल्याचे म्हटले आहे. ‘एक्स’ (X) वरील ‘सायबरपल्स५६’ या सायबर सुरक्षा खात्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.

दाव्यानुसार, लीक झालेल्या डेटामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती, कर्ज अर्ज, खाते उघडण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे आणि पत्त्यांसारख्या संवेदनशील तपशीलांचा समावेश असू शकतो. मात्र, या दाव्याची अद्याप पूर्णपणे पडताळणी झालेली नाही. तसेच, एसबीआयकडूनही यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

डेटा लीक झाल्यास ग्राहकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

जर हा डेटा लीक झाल्याचा दावा खरा ठरला, तर ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. सायबर गुन्हेगार या माहितीचा वापर करून ग्राहकांना लक्ष्य करू शकतात. बनावट कॉल, फसवे मेसेज आणि खोट्या बँकिंग प्रक्रियांच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच, वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर करून फसव्या कर्जांसारखे प्रकार घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

एसबीआयच्या ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी?

डेटा लीक झाल्याच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर एसबीआयच्या ग्राहकांनी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे.

अनोळखी व्यक्तींकडून येणारे कॉल, मेसेज आणि संशयास्पद लिंकपासून सावध राहा.

बँकेचे अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती देऊ नका.

तुमचा एटीएम पिन, ओटीपी, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नका.

खात्यातील व्यवहार नियमितपणे तपासा.

खात्यात संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा.

एसबीआयने काय म्हटले?

या प्रकरणात एसबीआयकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांचा डेटा प्रत्यक्षात लीक झाला आहे की नाही, तसेच कथित डेटामध्ये नेमकी कोणती माहिती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दाव्याची अधिकृत पुष्टी होईपर्यंत ग्राहकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!