ऊसदराच्या स्पर्धेत छत्रपती कारखान्याची मोठी खेळी! प्रतिटन ३५०१ रुपयांचा पहिला हप्ता, गेटकेनधारकांसाठीही तोच दर; कामगारांना बोनसची भेट


भवानीनगर : ऊसाला किती दर मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असतानाच भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने पहिला हप्ता जाहीर करून दराची कोंडी फोडली आहे. कारखान्याने प्रतिटन ३५०१ रुपये देण्याची घोषणा केली असून, सभासद आणि गेटकेनधारकांना समान दर देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कारखान्यासाठी हा गळीत हंगाम महत्त्वाचा मानला जात आहे.

कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांनी ऊसदराची घोषणा केली. यंदा १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासदांसह गेटकेनधारकांनीही आपला ऊस छत्रपती कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन निंबाळकर यांनी केले.

कामगारांना १५ टक्के बोनस; दिवाळी आणि संक्रांतीला मिळणार लाभ

ऊस उत्पादकांसोबतच कारखान्यातील कामगारांसाठीही बोनस जाहीर करण्यात आला आहे. दिवाळीच्या वेळी १० टक्के बोनस आगाऊ हप्ता म्हणून दिला जाणार आहे, तर उर्वरित ५ टक्के बोनस संक्रांतीच्या वेळी देण्यात येईल. त्यामुळे कामगारांना एकूण १५ टक्के बोनस मिळणार आहे.

‘वजनकाटा चोख, पैसे रोख’; कारखान्याचा दावा

ऊसाच्या वजनाबाबत पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत कारखान्याने ‘१००० किलोचा एक टन’ आणि ‘वजनकाटा चोख, पैसे रोख’ अशी भूमिका मांडली आहे. सभासदांचा ऊस, गेटकेनधारकांचा ऊस आणि साखरेचे वजन एकाच वजनकाट्याच्या व्यवस्थेत केले जात असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. ऊस उत्पादकांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी हा दर जाहीर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत, बाहेरील कारखान्यांना ऊस न घालण्याचे आवाहन करण्यात आले. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने विश्वस्ताच्या भूमिकेत काम केल्याचे निंबाळकर म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

या बैठकीला माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष कैलास गावडे, ज्येष्ठ संचालक रामचंद्र निंबाळकर, गणपतराव कदम, माजी उपाध्यक्ष अशोक पाटील, विधीज्ञ शरद जामदार, पृथ्वीराज घोलप, अजित नरूटे, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, निलेश टिळेकर, अनिल काटे, सतीश देवकाते, बाळासाहेब कोळेकर, सुचेता सपकळ, हनुमंत घोळवे, तानाजी शिंदे, संतोष मासाळ, विठ्ठलराव शिंगाडे, माधुरी राजपुरे, प्रशांत दराडे, सत्यवान चव्हाण आणि कार्यकारी संचालक अशोक जाधव उपस्थित होते.

आता १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासद आणि गेटकेनधारकांचा किती प्रतिसाद मिळतो, तसेच कारखाना आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यात कितपत यशस्वी होतो, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!