गोकुळचा निकाल लागताच अध्यक्षपदाचा सस्पेन्स संपला? सतेज पाटील यांचा शब्द ठरणार निर्णायक; चुयेकर कुटुंबातील ‘या’ नेत्याची चर्चा!


कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचार आघाडीने आघाडी घेतल्याने कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीला महायुतीने आघाडी घेतली होती; मात्र मतमोजणी पुढे सरकताच चित्र बदलले. उपलब्ध कलांनुसार, समविचार आघाडी १४ जागांवर, तर महायुती ११ जागांवर पुढे होती. त्यामुळे २५ सदस्यांच्या संचालक मंडळात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १३ जागांचा आकडा समविचार आघाडीने पार केल्याचे चित्र निर्माण झाले. या राजकीय घडामोडींसोबतच गोकुळच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार, याचीही चर्चा रंगली आहे.

सतेज पाटील यांनी दिलेला शब्द पाळणार?

निवडणूक प्रचारादरम्यान सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये समविचार आघाडीची सत्ता आल्यास संस्थापक सदस्य आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्षपदाची संधी देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आघाडी सत्तेत आल्यास शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा होणे बाकी असल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोकुळचे संस्थापक अध्यक्ष कोण, यावरून निवडणुकीच्या काळात महायुती आणि समविचार आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी शशिकांत चुयेकर यांच्या नावाची घोषणा करून अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे निकालानंतर त्यांच्या घोषणेची अंमलबजावणी होते का, हा महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे.

दहा आमदार-खासदारांचे बळ, तरी महायुती का मागे पडली?

महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र आले होते. आमदार आणि खासदारांचे राजकीय बळ असूनही त्यांना अपेक्षित आघाडी घेता आली नाही. जागावाटपावरून महायुतीत अंतर्गत संघर्ष निर्माण झाल्याचे या पराभवामागील प्रमुख कारण मानले जात आहे. हसन मुश्रीफ यांना काही नेत्यांनी केलेला विरोध आणि स्थानिक पातळीवरील मतभेदही चर्चेत राहिले. मुंबईत जागावाटप निश्चित झाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी एकत्रित प्रचार करण्याऐवजी आपापल्या तालुक्यांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले जात आहे.

गोकुळची निवडणूक केवळ दूध संघापुरती मर्यादित नसून, कोल्हापूरच्या राजकीय वर्चस्वाचीही परीक्षा मानली जात आहे. समविचार आघाडीची सत्ता निश्चित झाल्यानंतर शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्षपद मिळते का आणि सतेज पाटील आपला शब्द पाळतात का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!