टायगर श्रॉफ गोळीबारानंतर जितेंद्र आव्हाडांना धमकी! ‘दोन निळ्या शर्टवाल्यांना हटवा, मग दाखवतो’; पुण्यातील लोकेशनने वाढवलं गूढ

पुणे : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या घटनेने मुंबईत खळबळ उडाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. ‘बंगल्यावरच्या दोन निळ्या शर्टवाल्यांना काढा, मग दाखवतो,’ असे म्हणत धमकी दिल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. विशेष म्हणजे, संबंधित फोनचे ठिकाण पुण्यात असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

साडेचार वाजल्यापासून धमकीचे फोन?
जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः समाजमाध्यमांवर पोस्ट करत या प्रकाराची माहिती दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीने त्यांना दोन ते तीन वेळा फोन केला. फोनवर अर्वाच्य भाषेत बोलून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सायंकाळी साडेचार वाजल्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. धमकी देणारी व्यक्ती आपल्या घराच्या दरवाजावर उभी असल्याचेही सांगत होती, असा दावा आव्हाड यांनी केला.


या घटनेनंतर ठाणे शहर पोलिसांनी त्यांच्या पोस्टला उत्तर दिले. आव्हाड यांनी दिलेली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे यांच्याकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, धमकीसाठी वापरण्यात आलेल्या फोनचे ठिकाण पुण्यात असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणात पुणे पोलिसांनीही तातडीने हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.
रोहित शेट्टींच्या घराबाहेरही बंदोबस्त वाढला
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर चित्रपटसृष्टीतील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. या घटनेनंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती आहे. अशातच आव्हाड यांना धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या दोन्ही घटनांचा थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गोळीबारातील तिघे कोट्यात पकडले?
दरम्यान, टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर संशयित आरोपी मुंबईतून फरार झाल्याचे वृत्त आहे. ते दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या पुणे-जयपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कोटा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आता आव्हाड यांना धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण, पुण्यातील ठिकाणाचा या प्रकरणाशी काय संबंध आणि धमकीमागे कोणते कारण आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयित आणि आव्हाड यांना धमकी देणारी व्यक्ती यांच्यात काही संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
