महायुतीला धक्क्यावर धक्के! हसन मुश्रीफांच्या सुपुत्रानंतर शौमिका महाडिकही अवघ्या ७ मतांनी पराभूत; गोकुळमध्ये सतेज पाटलांचा डंका


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत यंदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळ दूध संघावर महाडिक घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने बाजी मारल्याने महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत पारंपरिक राजकीय घराण्यांतील दिग्गज नेत्यांचे नातेवाईकही रिंगणात होते. मात्र, महायुतीच्या दोन नेत्यांच्या कुटुंबातील उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव पराभूत झाल्यानंतर आता शौमिका महाडिक यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. शौमिका महाडिक यांचा अवघ्या सात मतांनी पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याचं समजतं.

गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला धक्का

राज्याचं लक्ष लागलेल्या आणि अनेक मंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने महायुतीला धक्का दिला आहे. गोकुळच्या विद्यमान संचालिका शौमिका महाडिक यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे महाडिक कुटुंबासह भाजप आणि महायुतीसाठी हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.

महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून शौमिका अमल महाडिक निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांच्याविरोधात काँग्रेसप्रणित राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे राजू जयवंतराव आवळे यांनी निवडणूक लढवली. या लढतीत शौमिका महाडिक यांचा सात मतांनी पराभव झाल्याची माहिती आहे.

मात्र, शौमिका महाडिक यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याचं समजत आहे. त्यामुळे फेरमतमोजणीनंतर अंतिम निकालात काही बदल होतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोण आहेत शौमिका महाडिक?

शौमिका महाडिक या भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांचे सासरे, तर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे त्यांचे दीर आहेत. शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं असून, त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत होत्या. याशिवाय, त्या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत.

राजकीय आणि सहकार क्षेत्रात महाडिक कुटुंबाचं महत्त्वाचं स्थान असल्याने शौमिका महाडिक यांच्या पराभवाची चर्चा रंगली आहे.

मागील निवडणुकीत ४३ मतांनी मिळवला होता विजय

गोकुळ दूध संघाच्या २०२२ मधील निवडणुकीत शौमिका महाडिक यांनी महाडिक गटाकडून विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांची सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाच्या अंजना केदारी रेडेकर यांच्याशी चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीत शौमिका महाडिक यांनी ४३ मतांनी विजय मिळवला होता आणि पहिल्यांदाच गोकुळच्या संचालकपदी निवडून आल्या होत्या.

मात्र, यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणं बदलल्याचं चित्र दिसत आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि महायुती यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत शौमिका महाडिक यांना सात मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याची माहिती समोर आली आहे. आता फेरमतमोजणीच्या मागणीनंतर अंतिम निकाल काय लागतो, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!