राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा झटका! बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा, सांगलीत नेमकं काय घडलं?

मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, पाच जागांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून प्रचाराला वेग आला आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून बंडखोरी आणि राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

नागपूर पदवीधर, मराठवाडा पदवीधर, पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक या मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. काही ठिकाणी एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रिंगणात उतरल्याचं चित्र आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
अरुण लाड यांच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण


या पार्श्वभूमीवर सांगलीतून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अरुण लाड यांनी महायुतीच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सांगलीत महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांसोबत अरुण लाडदेखील उपस्थित होते.
शरद पवार गटातील आमदाराने महायुतीच्या मेळाव्याला हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पुत्रानंतर अरुण लाडदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, अरुण लाड यांच्या भाजप प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीची मैत्रीपूर्ण लढत
दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीवरून महायुतीमध्ये वेगळंच राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. या जागेवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने दावा केला होता. मात्र, ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर शिवसेना शिंदे गटानेही निवडणुकीत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सचिन सानप यांची शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
एकीकडे विधान परिषद निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असताना, दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत अरुण लाड यांच्या महायुतीच्या मेळाव्यातील उपस्थितीमुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
