सोशल मीडियावर ओळख; एका महिलेनं दुसरीला गंडवलं, आधी विश्वास जिंकला अन् नंतर मोठा कांड केला…


पुणे : पुण्यात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शेअर बाजारात तब्बल ४०० टक्के नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून नऱ्हे परिसरातील एका ४१ वर्षीय महिलेला लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे.

सोशल मीडियावरील एका जाहिरातीवर क्लिक करणं महिलेला चांगलंच महागात पडलं. या प्रकरणात महिलेची तब्बल ३२ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात ‘मीना राजपूत’ नावाच्या महिलेवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.

नेमकी कशी झाली फसवणूक?

पीडित महिला नऱ्हे येथील गोल्ड अंबर सोसायटीमध्ये राहते. तिने सोशल मीडियावर शेअर ट्रेडिंगसंदर्भातील एक आकर्षक जाहिरात पाहिली आणि त्यावर क्लिक केलं. त्यानंतर ‘मीना राजपूत’ नावाच्या संशयित महिलेनं तिला एका खासगी सोशल मीडिया ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं. एका खासगी ॲपच्या माध्यमातून शेअर बाजार आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत भरघोस परतावा मिळेल, असं आमिष दाखवण्यात आलं.

या आश्वासनांवर विश्वास ठेवून पीडित महिलेनं मोठी रक्कम बनावट ॲपमध्ये गुंतवली. मात्र, तब्बल ३२ लाख ३० हजार रुपये गुंतवूनही तिला कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिनं नऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ‘मीना राजपूत’ या नावामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या सायबर फसवणुकीचं जाळं किती मोठं आहे, याचा तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!