पुण्यात निवृत्त प्राचार्यासोबत धक्कादायक प्रकार; अमेरिकेत राहणाऱ्या मुलाच्या नावाने मेसेज, पुढे जे घडलं ते हादरवणारं..


पुणे : पुण्यात सायबर भामट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरातून समोर आला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने पार्सल पाठवल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका ८२ वर्षीय निवृत्त प्राचार्याची तब्बल ३ लाख २३ हजार २१९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत सायबर चोरट्यांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला. तुमच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने तुमच्यासाठी एक महत्त्वाचे पार्सल पाठवले आहे, असे सांगून भामट्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पार्सलच्या डिलिव्हरी आणि प्रक्रियेचे कारण देत चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दोन्ही मोबाईल फोनमध्ये एक संशयास्पद ॲप डाउनलोड करण्यास सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांनी सांगितल्यानुसार प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती भरून घेण्यात आली. यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मुलाच्या व्हॉट्सॲपवरून संदेश आल्याचा भास निर्माण करणारे बनावट मेसेज पाठवले. या प्रकारातून भामट्यांनी दोन्ही मोबाईल फोनचा रिमोट ॲक्सेस मिळवला आणि फोन हॅक केले.

मोबाईलचा ताबा मिळवल्यानंतर सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख २३ हजार २१९ रुपये लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निवृत्त प्राचार्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी कोंढवा पोलीस आणि सायबर सेलच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात सायबर चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करू नये. तसेच बँक खात्याचे तपशील, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!