एसटीतून उतरून घराकडे निघाली, वाटेतच काळाने गाठलं! सिंधुदुर्गात २० वर्षीय दामिनीची चाकूने भोसकून हत्या; सहा तासांत आरोपी साईल धुरी जेरबंद


सिंधुदुर्ग : घराकडे जाणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा प्रवास वाटेतच संपल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. कुडाळ तालुक्यातील कडावल-वर्दे रस्त्यावर हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या दामिनी किरण पालव हिची धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आली. शनिवारी घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शोधमोहीम राबवली आणि अवघ्या सहा तासांत संशयित आरोपी साईल धुरी याला ताब्यात घेतले.

दामिनी (वय २०, रा. खालची पालववाडी, वर्दे) ही कडावल येथून एसटी बसने आल्यानंतर उतरून पायी आपल्या घराकडे जात होती. याचवेळी साईल धुरी (रा. मठ, ता. वेंगुर्ले) हा दुचाकीसह रस्त्यात दबा धरून बसल्याचा प्राथमिक तपासात संशय आहे. दामिनी जवळ येताच त्याने तिला अडवले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यानंतर तिचा मृतदेह रस्त्यालगतच्या ओढ्यात फेकून आरोपी दुचाकीवरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेदरम्यान जवळच्या शेतात काम करणाऱ्या एका लहान मुलाने तरुणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. तो घटनास्थळी पोहोचेपर्यंत हल्लेखोर पळून गेला होता. मुलाने गावात जाऊन घटनेची माहिती दिल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळवले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि ओरोस व कुडाळ पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जिल्ह्यात नाकाबंदी करून आरोपीच्या शोधासाठी सहा विशेष पथके रवाना करण्यात आली. दामिनीच्या मोबाईलवरील शेवटचे दूरध्वनी, तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या दुचाकीच्या वर्णनाच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला.

अखेर रविवारी पहाटे वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील घरातून साईल धुरी याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दामिनी आणि संशयित आरोपीची पूर्वीपासून ओळख होती. हा खून एकतर्फी प्रेमातून झाला की अन्य वैयक्तिक वादातून, याचा तपास सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि दुचाकी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून, हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!